जळगाव :- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरात असलेल्या एका जुन्या बंद पडलेल्या स्विमिंग पूलमध्ये मंगळवारी एका प्रौढाचा मृतदेह आढळून आला आहे. रोहिदास मोतीलाल निकुंभ असे मयताचे नाव असून दि.१ मे रोजी मजुरीचा पगार मिळाला असल्याने तो त्यांनी घरी कुटुंबियांच्या हाती दिला. स्वतःच्या खर्चासाठी ५०० रुपये घेऊन ते घराबाहेर पडले होते. रात्री घरी न आल्याने कुटुंबियांना शोध घेतला तरी ते मिळून आले नाही. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी उद्यान जे.के.पार्क परिसरातील बंद पडलेल्या स्विमिंग पूलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
तांबापुरा परिसरात राहणारे रोहिदास मोतीलाल निकुंभ हे रस्ते बांधकाम ठिकाणी मजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते. दि..१ मे रोजी त्यांचा पगार झालेला होता. घरी कुटुंबियांच्या हाती पगाराचे पैसे दिल्यावर त्यांनी स्वतःच्या खर्चासाठी ५०० रुपये घेतले होते. घरातून पैसे घेतल्यावर ते घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली होती. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मेहरूण तलाव परिसरातील जे.के.पार्क छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरात असलेल्या एका बंद स्विमिंग पूलमध्ये रोहिदास निकुंभ यांचा मृतदेह आढळून आला.
जुन्या स्वीमींग पुलामध्ये पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगत असल्याने काही जणांनी पहिले आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास गणेश शिरसाळे करित आहेत. दरम्यान, बंद स्विमिंग पूल परिसरात नागरिक शौचास जात असतात. कदाचित त्याठिकाणी पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.