अलिबाग, दि. 2 :- महाविकास आघाडीचे हे शासन राज्याचा विविध प्रकारे विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेच, त्याप्रमाणेच उरण तालुक्याच्या विकासासाठीही हे शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या युवक व क्रीडा राज्यमंत्री तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज उरण तालुक्यातील करंजा येथे केले.
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन या सामाजिक कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामवंत संस्थेतर्फे दि.2 ते 6 जानेवारी 2022 दरम्यान एन.एम.एस.ई झेड (सेझ )मैदान, पोलीस चौकी जवळ, केअर पॉईंट हॉस्पिटल समोर, बोकडविरा, तालुका उरण येथे जिल्हास्तरीय 21 व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी करोनाविषयक सर्व प्रतिबंधक नियम व अटींचे पालन करीत प्रशांत पाटील, भावना घाणेकर, भार्गव पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, डॉ. मनीष पाटील, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, वैशाली घरत तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, पदाधिकारी उपस्थित होते.