अग्निशमनदलाच्या ‘ब्रांटो’ गाडीची व्यथा
पुणे- शहरात उंच इमारतींमध्ये आग लागल्यास आग नियंत्रणासाठी तसेच नागरिकांच्या बचावासाठी महापालिकेने तब्बल 70 मीटर उंचीपर्यंत जाणारी शिडी असलेल्या आणि 10 कोटींपेक्षा अधिक किंमत असलेल्या तीन ब्रांटो गाड्या खरेदी केल्या आहेत. मात्र, या गाड्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती आणि शिडी उघडते का याबाबत महापालिकेचा अग्निशमन विभाग गंभीर नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
1 मे रोजी महाराष्ट्र दिनी महापालिकेच्या प्रांगणात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यासाठी एक ब्रांटो गाडी आणण्यात आली होती. मात्र, या गाडीची शिडीच काम करत नसल्याने ही गाडी परत पाठविण्याची वेळ प्रशासनावर आली. ही घटना प्रथमदर्शनी किरकोळ वाटत असली तरी प्रत्यक्षात एखाद्या आगीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
शहरात गेल्या काही वर्षांत अनेक उंच इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. या इमारतींमध्ये आगीच्या घटना घडल्यास तत्काळ आगीच्या ठिकाणी पोहचणे तसेच नागरिकांचे जीव वाचविणे यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात तीन अत्याधुनिक सुविधा असलेल्या ब्रांटो गाड्या खरेदी केल्या असून त्यांची किंमत 10 ते 12 कोटींच्या घरात आहे. यात एका गाडीची शिडी 70 मीटर, तर इतर दोन गाड्यांच्या शिड्या या 42 मीटर उंच आहेत. या गाड्या कधीही वापराव्या लागत असल्याने दररोज त्या सुरू करून त्यांचे बूम (गाडीचे आणि शिडीचे वजन पेलणारे जॅक) ऑपरेट होतात की नाही हे पाहणे आवश्यक आहे. तसेच आलटून-पालटून या गाड्यांची प्रत्येक आठवड्याला देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या आगीच्या घटेनेवेळी या गाड्या व्यवस्थित चालल्यास तातडीने मदत होणार आहे. मात्र, महापालिकेत आयुक्तांच्या समोरच घडलेल्या या घटनेने या गाड्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून असे प्रकार आगीच्या ठिकाणी घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.