मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अपना बाजार या सहकारी संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षाला प्रारंभ होत असून त्यानिमित्ताने ९ मे २०२२ या दिवशी सायंकाळी चार वाजता नायगांव-दादर परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
दादासाहेब सरफरे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ९ मे १९४८ रोजी नायगाव कामगार ग्राहक सहकारी मंडळ लिमिटेड या एका लहानशा विक्री दालनाची सुरुवात केली. १९६८ मध्ये संस्थेने नायगाव विभागात पहिले डिपार्टमेंट स्टोअर्स सुरू केले. छोट्याशा रोपट्याचे हळूहळू वटवृक्षात रूपांतर होऊ लागले. कालांतराने नवनवीन शाखा सुरू करण्यात आल्या.
मुंबई, नवी मुंबई आणि कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातही संस्थेने आपले पाय रोवले. बहुराज्य स्तरांवर गोवा व गुजरात या ठिकाणीही संस्थेची विक्री दालने सुरू करण्यात आली. श्रीपाद फाटक यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ, संस्थेचे सर्व कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आजपर्यंत अपना बाजारला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
अपना बाजारने अनेक लहान लहान ग्राहक सहकारी संस्थांना आपल्या संस्थेत विलीन करून घेतले आहे. महाराष्ट्र राज्यात सहकारी चळवळ नेहमी अग्रेसर राहिली आहे. अपना बाजारने सहकार क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व कायम करून एक आदर्श निर्माण केला आहे.
अमृतमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ भव्य शोभायात्रेने होत आहे. त्यानंतर वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे तसेच त्यानंतर समारोपाचा भव्य सोहळा होईल, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.