औरंगाबादेत गुटखा तस्करीचा पर्दाफाश; कंटेनरसह ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त, चालक अटकेत.

Spread the love

औरंगाबाद :- औरंगाबाद ते जळगाव मार्गावरील फर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून केल्या जाणाऱ्या गुटखा तस्करीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एक कंटेनर ताब्यात घेतला आहे. यावेळी पोलिसांना ३७ लाख १५ हजार रुपयांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू आढळून आली आहे. या कारवाईत पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

हमीद हरूण खाँ असं अटक केलेल्या ३५ वर्षीय आरोपी चालकाचं नाव आहे. तो हरियाणा राज्याच्या पलवल जिल्ह्यातील नखरोला येथील रहिवासी आहे. औरंगाबाद ते जळगाव मार्गावरून छुप्या पद्धतीनं गुटखा तस्करी होत असल्याची गुप्त माहिती फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे फर्दापूर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी हॉटेल कन्हैय्या परिसरात सापळा रचला होता.

यावेळी औरंगाबाद ते जळगाव मार्गावरून येणाऱ्या कंटेनरला पोलिसांनी थांबवलं. पोलिसांनी कंटेनर चालकाकडे चौकशी केली असता, त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली. यावेळी पोलिसांनी कंटेनरची पाहणी केली असता, पोलिसांना प्रिमियम राज पान मसालाच्या ७८ गोण्या, तर प्रिमियम एक्स एल सुंगधित तंबाखूच्या १५ गोण्या आढळून आल्या आहेत. याची बाजारातील किंमत ३७ लाख १५ हजार इतकी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीच्या कंटेनरसह एकूण ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कंटेनर चालकाकडे अधिक चौकशी केली असता, संबंधित गुटखा दिल्लीहून सोलापूरकडे नेण्यात येत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत कंटेनर चालकाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास फिर्दापूर पोलीस करत आहेत.

टीम झुंजार