हेरवाड गावाने पतीच्या मृत्यूनंतरची “ही’ प्रथा केली बंद.

Spread the love

कोल्हापूर –महाराष्ट्राची (Maharashtra) संपूर्ण देशभरात पुरोगामी राज्य अशी ओळख आहे. महाराष्ट्रानं देशाला दिशा दाखवणारे विचार दिले आहेत. रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार अशा अनेक गोष्टींची सुरुवात आपल्या राज्यात झाली आणि त्या योजना देशानं स्वीकारल्या. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हेरवाड (Herwad) गावानं महाराष्ट्रासह देशाला दिशा दाखवणारा निर्णय घेतला आहे. हेरवाड ग्रामपंचायतीनं विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतिशील वारसा सांगणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीनं घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक करण्यात येत आहे. आगामी काळात हेरवाडचा आदर्श महाराष्ट्रभर घेतला जाऊ शकतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावाने छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीशताब्दी वर्षात एक चांगला पुढाकार घेतला आहे. पतीच्या मृत्यूनंतर ‘विधवा विधी’वर बंदी घालण्याचा ठराव गावाने संमत केला आहे. शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावात 4 मे रोजी पतीच्या मृत्यूनंतर विधवेच्या बांगड्या फोडणे, कपाळावरचे कुमकुम (सिंदूर) पुसणे आणि मंगळसूत्र काढणे या प्रथेवर बंदी घालणारा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायत सरपंच सुरगोंडा पाटील यांनी ही माहिती दिली.

सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. महिलेसोबतच्या या ‘अपमानजनक’ प्रथेवर बंदी घालण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीला ठराव पास करण्यास प्रोत्साहित केले.

पाटील म्हणाले की, स्त्रीमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या शाहू महाराजांची 100 वी पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत. त्यांनी महिलामुक्तीसाठी काम केले. आम्हाला आमच्या या प्रस्तावाचा खूप अभिमान वाटतो कारण हेरवाडने इतर ग्रामपंचायतींसाठी एक एक चांगले उदाहरण समोर ठेवले आहे.

या उपक्रमाबाबत महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष प्रमोद झिंजाडे म्हणाले की, करोना महामारीच्या पहिल्या लाटेत आमच्या एका सहकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मी पाहिले की त्यांच्या पत्नीला बांगड्या फोडायला, मंगळसूत्र काढायला आणि कुंकु पुसायला भाग पाडण्यात आले. हे सर्व घडत असतानाचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. त्यामुळे महिलेच्या दु:खात भर पडली. हे पाहून मी ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि याबाबत गावातील नेते व पंचायतींशी संपर्क साधला.

झिंझाडे यांनी स्पष्ट केले की, उदाहरण मांडण्यासाठी मी स्टॅम्प पेपरवर जाहीर केले की माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीला ही प्रथा लागू करू नये. यानंतर माझ्या घोषणेला 20 हून अधिक लोकांनी पाठिंबा दिला. त्यानंतर हेरवाड ग्रामपंचायतीने माझ्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी याबाबत ठराव करावा, असा प्रस्ताव मी मांडला. त्यांच्या या निर्णयाला लोक पाठिंबा देत असल्याचे झिंजाडे यांनी सांगितले. एवढेच नाही तर त्याचा प्रचार करण्यासाठी एक बहुआयामी कार्यक्रमही करण्यात आला आहे. तसेच या प्रथेवर बंदी घालण्यासाठी कायदा करण्याची मागणी करणारे निवेदन आम्ही राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना विधवांच्या स्वाक्षरीने दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

टीम झुंजार