सातारा, दि. ३ :- “क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थानं देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. सावित्रीबाईंनी स्त्रीसक्षमीकरणासाठी काम केलं. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्या सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नायगाव या जन्मगावी जाऊन आदरांजली वाहिली. सावित्रीबाईंचे जन्मगाव नायगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावित्रीबाईंचे जन्मगाव नायगाव ता.खंडाळा, जि.सातारा येथे जाऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी उपुख्यमंत्री बोलत होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई यांचा जन्मदिन राज्य शासनातर्फे ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जातो. राज्यातील जनतेला ‘महिला शिक्षण दिना’च्याही उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.