मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा साठावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला. पंजाब किंग्जने ५४ धावांनी हा सामना जिंकला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पंजाब किंग्जकडून सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रो आणि शिखर धवन यांनी झंझावाती सुरूवात करून दिली.
दोघेही एकमेकांना उत्तम साथ देत असताना ग्लेन मॅक्सवेलने शिखर धवनचा त्रिफाळा उध्वस्त केला. त्याने २ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने १५ चेंडूंत नाबाद २१ धावा काढल्या. त्यावेळी धावसंख्या ५ षटकांत ६० झाली होती. जॉनी बेअरस्ट्रोने ब्रेबॉर्नवर आणलेल्या वादळात लिअाम लिव्हिंगस्टोनने भर घातली. जॉनी बेअरस्ट्रोने ४ चौकार आणि ७ षटकारांच्या सहाय्याने २९ चेंडूंत नाबाद ६६ धावा काढल्या. त्याला शाहबाझ अहमदने बाद केले. आजचा दिवस लिअाम लिव्हिंगस्टोनचा होता. त्याच्या आज्ञेनुसार चेंडू त्याला पाहिजे तिथे जात होता. त्याने ५ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ४२ चेंडूंत ७० धावा काढल्या. त्याला हर्षल पटेलने बाद केले. तो बाद झाल्यामुळे अंतिम धावसंख्येत १५ धावांचा तरी फरक पडला. कर्णधार मयंक अगरवालला हर्षल पटेलने १९ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. २०व्या षटकाच्या अखेरीस पंजाब किंग्जने २०९/९ असा धावांचा डोंगर उभा केला. हर्षल पटेलने ३४/४, वाणींदू हसरंगाने १५/२, ग्लेन मॅक्सवेल आणि शाहबाझ अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने धावांचा डोंगर पाहून नांगी टाकली. ग्लेन मॅक्सवेल संघाला विजयी धावसंख्ये जवळ नेण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्याने ३ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने २२ चेंडूंत ३५ धावा काढल्या. त्याला हरप्रीत ब्रारने बाद केले. रजत पाटीदारने १ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने २१ चेंडूंत २६ धावा काढल्या. त्याला राहुल चहरने बाद केले. विराट कोहलीला कसिगो रबाडाने २० धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. इतर ८ फलंदाजांनी एकत्रित ६४ धावांची भर घातली.
त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू केवळ १५५/९ अशी धावसंख्या गाठू शकले आणि पंजाब किंग्जने ५४ धावांनी हा सामना जिंकला. कसिगो रबाडाने २१/३, ऋषी धवन आणि राहुल
चहरने प्रत्येकी २ गडी, अश्रदीप सिंग आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी १ गडी बाद करून बेंगळुरूला तिखट मारा काय असतो याचं प्रात्यक्षिक दाखवलं. बेंगळुरू सामना हरल्यानंतरही चौथ्या क्रमांकावर कायम आहे. पण त्यांना गुजरात टायटन्स विरुद्ध होणारा सामना जिंकावाच लागेल. चौथ्या क्रमांकासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
जॉनी बेअरस्ट्रोला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने केवळ २९ चेंडूंत ६६ धावा काढल्या होत्या.
उद्याचा सामना कोलकाता क्नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर होणार आहे. बेंगळुरू परतीचा सामना जिंकून तिसर्या स्थानावर झेप घेण्याचा प्रयत्न करेल. कोलकाता पलटवार करून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.