टाटा आयपीएल – अटीतटीच्या लढतीत हैदराबाद विजयी

Spread the love
छायाचित्र सौजन्य : गुगल

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा पासष्टवा सामना मुंबई इंडिअन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. हैदराबादने ३ धावांनी हा सामना जिंकला. मुंबईने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली.

हैदराबादच्या राहुल त्रिपाठीने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ९ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ४४ चेंडूंत ७६ धावा काढल्या. त्याला रमणदीप सिंगने बाद केले. पराग गर्गने ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने २६ चेंडूंत ४२ धावा काढल्या. त्याला स्वतःच्याच गोलंदाजीवर रमणदीप सिंगने झेलबाद बाद केले. यष्टिरक्षक निकोलस पुरणने २ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने २२ चेंडूंत ३८ धावा काढल्या. त्याला रिले मेरेडिथने बाद केले. २०व्या षटकाच्या अखेरीस हैदराबादने १९३/६ अशी भक्कम धावसंख्या उभारली. रमणदीप सिंगने २०/३, डॅनियल सॅम्स, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

हैदराबादला अनपेक्षित प्रतिकार आणि प्रतिहल्ला मुंबईच्या फलंदाजांनी केला. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशनने ९५ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने २ चौकार आणि ४ षटकारांच्या ३६ चेंडूंत ४८ धावा काढल्या. त्याला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. पुढच्याच षटकात इशान किशन उमरान मलिकच्या गोलंदाजीवर बाद झाला. इशान किशनने ५ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने ३४ चेंडूंत ४३ धावा काढल्या. दोन्ही जम बसलेले फलंदाज लागोपाठ बाद झाले. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांवर अतिरिक्त दडपण आले. कोणीही फलंदाज अधिक वेळ खेळपट्टीवर टिकाव धरू शकत नसताना टीम डेव्हिडची बॅट तळपत होती. त्याने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने १८ चेंडूंत ४६ धावा काढल्या.

शेवटच्या दोन षटकांत मुंबईला १९ धावांची गरज असताना जसप्रीत बुमराहला १९व्या षटकात एकही धाव काढता आली नाही. त्यामुळे २०व्या षटकात १९ धावा काढण्यासाठी रमणदीप सिंगने कंबर कसली. फझलहक फारूकीने पहिला चेंडू स्वैर टाकला. पण त्याच्या पर्यायी चेंडूवर धाव घेता येणार नाही याची काळजी घेतली. पुढच्या दोन चेंडूंवर सिंगने दोन धावा काढल्या. चौथ्या चेंडूवर चौकार लगावला. फारूकीने पाचवा चेंडू यॉर्कर टाकला, त्यामुळे धाव घेता आली नाही. सहाव्या चेंडूवर सिंगने षटकार मारून मुंबईची धावसंख्या १९०/७ अशी प्रत्युत्तरात्मक केली. पण हैदराबाद ३ धावांनी विजयी झाले. उमरान मलिकने २३/३, भुवनेश्वर कुमार, वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

राहुल त्रिपाठीला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने फलंदाजी करताना ४४ चेंडूंत ७६ धावा काढल्या होत्या.
उद्याचा सामना कोलकाता क्नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. लखनौला हा विजय दुसर्‍या क्रमांकाचा आणि कोलकत्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवल्याचा आनंद देईल.

टीम झुंजार