
झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :-तालुक्यातील फरकांडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन,आदर्श शेतकरी समाधान दयाराम पाटील (उमरे ता एरंडोल ) यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार मिळाला असून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात झालेल्या भव्य समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पाटील यांना सपत्नीक कृषिभूषण पुरस्कार देण्यात आला.
राज्यातील कृषी, फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पन्नवाढीसाठी योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. उमरे तालुका एरंडोल येथील शेतकरी समाधान दयाराम पाटील यांनी त्यांच्या शेताजवळ ठीकठिकाणी बंधारे बांधून त्या माध्यमातून फळबागायत फुलून अनोखा प्रयोग केला आहे.
याची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. राज्यपालांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याने पाटील यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार चिमणराव पाटील,पारोळा बाजार समितीचे सभापती अमोल पाटील,जि प सदस्य नानाभाऊ महाजन व कृषी क्षेत्रातील मान्यवर अधिकारी वर्गाने अभिनंदन केले आहे.
आदर्श शेतकरी समाधान दयाराम पाटील यांना वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल एरंडोल येथे प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार सुचिता चव्हाण,बाजार समितीचे माजी सभापती,शालिकग्राम गायकवाड, संचालक मिलिंद पवार,सुरत महानगरपालिकेचे नगरसेवक सुरेश सोनवणे, आडगाव ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पवार,मुकुंदा पाटील,टोळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील,एरंडोल तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय चौधरी, यांनी सत्कार करून अभिनंदन केले.तसेच झुंजार न्यूज पोर्टल च्या वतीने संघरत्न गायकवाड यांनी स्वागत केले.





