टाटा आयपीएल – चेन्नईने राजस्थानला विजयासाठी झुंजवले

Spread the love
छायाचित्र सौजन्य : गुगल

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला. राजस्थान रॉयल्सने हा सामना ५ गडी २ चेंडू राखून जिंकला. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. चेन्नईकडून मोईन अलीने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने १३ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ५७ चेंडूंत ९३ धावा काढल्या. त्याने ओबेद मॅकोयने बाद केले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला यझुवेंद्र चहलने २६ धावांवर बाद केले. डेव्हन कॉन्वेला रवीचंद्रन अश्विनने १६ धावांवर पायचीत टिपले. बाकी फलंदाजांनी केवळ हजेरी लावली त्यामुळे चेन्नई

१५०/६ धावांचं लक्ष राजस्थान समोर ठेवू शकला. ओबेद मॅकोयने २०/२, यझुवेंद्र चहलने २६/२, रवीचंद्रन अश्विन, ट्रेण्ट बोल्ट यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ८ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने ४४ चेंडूंत नाबाद ५९ धावा काढल्या. त्याला प्रशांत सोलंकीने बाद केले. कर्णधार संजू सॅमसनला १५ धावांवर मिशेल सँटनरने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. रवीचंद्रन अश्विनने सामन्यात रंग भरले. त्याने खेळपट्टीवर येताच मैदानाचा ताबा घेतला. त्याने २ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने २३ चेंडूंत नाबाद ४० धावा काढल्या. रीयान परागने नाबाद १० धावा काढल्या. सामन्याच्या शेवटच्या षटकात ६ चेंडूंत ६ धावांची गरज असताना. मथिशा पथिराना हे षटक टाकण्यासाठी तयार झाला.

पहिल्या चेंडूवर रीयानने एक धाव लेगबायच्या स्वरूपात घेऊन अश्विनला स्ट्राईक दिला. दुसर्‍या चेंडूवर अश्विनने चौकार मारला. तिसर्‍या चेंडूवर १ धाव घेऊन धावसंख्या बरोबरीस आणली. चौथ्या चेंडूवर रीयानला धाव घेता आली नाही. आणि पुढचाच चेंडू पंचांनी स्वैर जाहीर करताच राजस्थानचा संघ विजयी झाला. ते दुसर्‍या क्रमांकावर पोहचले. त्यांचा प्लेऑफचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध २४ मे रोजी कोलकत्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे.

रवीचंद्रन अश्विनला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने फलंदाजी करताना २३ चेंडूंत ४० धावा काढल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना २८ धावांमध्ये १ गडी बाद केला होता.
उद्याचा सामना मुंबई इंडिअन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबईला पराभवाची चिंता नाही. पण दिल्लीला हा विजय चौथ्या क्रमांकावर घेऊन जाऊ शकतो.

टीम झुंजार