जळगाव : – सध्या चोर चोरी करण्यासाठी काय काय युक्ति करतिल याचा काही नेम नाही.अशिच एक घटना जळगाव शहरात घडली आहे.आपली दुचाकी विकण्यासाठी एका तरुणाने ओएलएक्स या वेबसाइटवर दुचाकीच्या फोटोसह माहिती टाकली होती. त्यानुसार एकाने दुचाकी खरेदीचा बहाणा करत तरुणाशी संपर्क साधला. टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने त्याने दुचाकी चालवायला घेतली. पण तो दुचाकी घेवूनच पसार झाल्याची घटना जळगाव शहरात समोर आली आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव शहरातील विवेकानंदनगर भागात अक्षय रमेश मोरे वय २२ हा तरुण वास्तव्यास आहे. त्याला त्याची एम.एच.१९ डी.एल.४५९८ या क्रमाकांची दुचाकी विक्री करायची असल्याने अक्षय याने याबाबत ओएलएक्स या ऑनलाइन वेबसाइटवर दुचाकीबाबतची माहिती दिली. १७ मे रोजी ओएलएक्सवरील माहितीनुसार कुणाल राजपूत नामक एक तरुण रिक्षाने शहरातील वाघनगर परिसरात आला. दुचाकी खरेदी करायची असल्याने सांगत त्याने दुचाकीमालक अक्षय याच्याशी संपर्क साधला. जी दुचाकी विक्री करायची आहे, ती घेवून वाघनगर परिसरात यायला सांगितले. अक्षय त्याची दुचाकी घेवून वाघनगरात पोहचला.
स्पीड चेक करतो… अन् दुचाकी घेवून झाला पसार
दुचाकी खरेदी करायला आलेल्या कुणाल याने दुचाकी चालवून बघायची असे सांगितले. त्याच्यासोबत अक्षय हा सुद्धा मागे बसून गेला. त्यानंतर कुणाल याने पुन्हा दुचाकीचा स्पीड चेक करायचा असल्याचा बहाणा केला. आणि अक्षयला उतरवून एकटाच दुचाकी घेवून गेला. यानंतर तो परत आलाच नाही. दोन दिवस उलटूनही तरुण दुचाकी घेवून परत न आल्याने अक्षयने रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार केली. तक्रारीवरुन ४० हजार रुपयांची दुचाकी घेवून तिचे पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी कुणाल राजपूत व एक अज्ञात तरुण अशा दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील हे करत आहेत.
सापडू नये म्हणून रिक्षाचालकाच्या फोनवरुन लावला फोन
आपला पोलिसांना शोध लागू नये म्हणून दुचाकी घेण्यासाठी आलेल्या तरुणाने खबरदारी घेत स्वतःच्या मोबाइलवरुन संपर्क न साधता, ज्या रिक्षातून तो आला त्याच रिक्षाचालकाच्या मोबाइलवरुन संपर्क साधला होता. संबंधित क्रमाकांवर पोलिसांनी चौकशीसाठी फोन केल्यावर तो रिक्षाचालक निघाला. रिक्षातून आलेल्या तरुणाने मला एक फोन करायचा, असे सांगितले आणि माझ्या फोनवरुन फोन लावला. दुचाकी घेवून जाणाऱ्या तरुणाला आपण ओळखत नसल्याची माहिती रिक्षाचालकाने चौकशीत पोलिसांना दिली.