पोलिसांमुळे वाचले मुलांसह आत्महत्या करणाऱ्या महिलेचे प्राण ; नवऱ्याच्या जाचाला कंटाळून उचलले होते टोकाचं पाऊल.

Spread the love

अमळनेर :- सध्या मानसिक जाचाला कंटाळून लोक टोकाचं पाऊल उचलत अश्यातच मद्यधुंद नवऱ्याच्या जाचाला कंटाळून मुलांसह आत्महत्या करायला निघालेल्या महिलेला 112 या हेल्पलाइन नंबरमुळे कॉल सुविधेमुळे पोलिसांचा आधार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. ही घटना अमळनेर तालुक्यातील आटाळे येथे घडली.

अटाळे येथील स्वप्नील विठ्ठल पाटील हा पत्नी सोनाबाई पाटील (वय ३१) यांच्याकडे २१ रोजी सकाळी १२ वाजता मद्य पिण्यासाठी पैसे मागत होता. पैसे मिळाले नाहीत म्हणून त्याने रागाच्या भरात सोनाबाईला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच लहान १० वर्षाचा मुलगा आदित्य व चार वर्षांची मुलगी योगिता यांनाही मारहाण केली. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. त्याचवेळी दीर सागर पाटील, सासू पुष्पाबाई पाटील, नणंद वैशाली भागवत पाटील यांनीही शिवीगाळ करून धमकी दिली. या संदर्भात सोनाबाई पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी रिक्षाने येत होती. मात्र, तिच्या पतीने तिला रिक्षात बसू दिले नाही. त्यामुळे सोनाबाईने पायी रस्ता धरून रस्त्यात एका विहिरीत दोन्ही मुलांसह आत्महत्येचा निर्णय केला. या वेळी तेथे असलेल्या एका व्यक्तीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती.

अदखलपात्र गुन्हा दाखल अखेर महिला दोन मुलांसह आत्महत्या करत असल्याचा 112 क्रमांकाला कॉल गेला. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तत्काळ दीपक माळी व रवींद्र पाटील या पोलिसांना घटनास्थळी पाठवले. ताेपर्यंत या महिलेला काही ग्रामस्थांनी थोपवून धरले होते. दोन्ही पोलिसांनी तिचे मन परिवर्तन करून पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना सोबत पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी साेनाबाईच्या तक्रारीवरून मद्यपी पती, दीर, सासू व नणंद यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

112 या हेल्पलाइन नंबरमुळे वाचले प्राण…

112 या हेल्पलाइन नंबरवर नागरिक संपर्क करून मदत मागू शकतात. मदत मागितल्यास तो कॉल तात्काळ ट्रेस होऊन दहा मिनिटात मदत पोहचवण्याचा प्रयत्न असणार आहे. नवी मुंबई आणि नागपूर या दोन ठिकाणी या हेल्पलाइन नंबरचे कॉल सेंटर असणार आहे.

टीम झुंजार