मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा सत्तरावा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. पंजाब किंग्जने ५ गडी आणि २९ चेंडू राखून हा सामना जिंकला. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. अभिषेक शर्माने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ५ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ३२ चेंडूंत ४३ धावा काढल्या. त्याला हरप्रीत ब्रारने बाद केले. वॉशिंग्टन सुंदरला नॅथन इलिसने २५ धावांवर बाद केले.
एडन मार्करामला २१ धावांवर हरप्रीत ब्रारने बाद केले. राहुल त्रिपाठीला २० धावांवर हरप्रीत ब्रारने बाद केले. रोमारीओ शेफर्डने प्रत्येकी २ चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने १५ चेंडूंत नाबाद २६ धावा काढल्या. त्यामुळे हैदराबादचा संघ १५७/८ इतकी मजल गाठू शकला. हरप्रीत ब्रारने २६/३, नॅथन इलिसने ४०/३, कासिगो रबाडाने ३८/१ गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल पंजाब किंग्जकडून जॉनी बेअरस्ट्रो आणि शिखर धवन यांनी धडाकेबाज सुरूवात केली. जॉनी बेअरस्ट्रोने ५ चौकारांच्या सहाय्याने २३ धावा काढल्या. त्याला फजलहक फारुखीने बाद केले. शिखर धवनने प्रत्येकी २ चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने ३२ चेंडूंत ३९ धावा काढल्या. त्याला फजलहक फारुखीने बाद केले. शाहरूख खानला १९ धावांवर उमरान मलिकने बाद केले. जितेश शर्माने ३ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने ७ चेंडूंत १९ धावा काढल्या. त्याला जगदीशा सुचिथने बाद केले. लिअम लिव्हिंगस्टोनने २ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने २२ चेंडूंत नाबाद ४९ धावा काढल्या. प्रेरक मंकडने पहिलाच चेंडू खेळताना उमरान मलिकला चौकार लगावला आणि पंजाबने १६०/५ अशी विजयी धावसंख्या नोंदवली. त्याचसोबत साखळी सामन्यातल्या पराभवाची परतफेड देखील केली.
हरप्रीत ब्रारला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने २६ धावांमध्ये ३ गडी बाद केले होते. आता सगळ्यांना वेध प्लेऑफच्या सामन्यांचे लागले आहेत. २४ मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स याच्यात तर दुसरा सामना २५ मे रोजी लखनौ सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात कोलकत्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर होणार आहेत.