
चोरट्यांची विन क्रमांकाची दुचाकी जप्त.
पारोळा :- सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.अशयातच पारोळा येथील पालिका चौकातील किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून, २० हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेतील तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. दरम्यान, चोरटे दुकानात असतानाच गस्तीवरील पोलिसांचे वाहन आल्यानंतर चोरटे विनाक्रमांकाच्या दुचाकीवर पसार झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. त्यामुळे चोरटे दुचाकी सोडून अंधारात पसार झाले.
याप्रकरणी पारोळा पोलिसात राम हिंदुजा यांनी फिर्याद दिली. २३ रोजी रात्री नऊ ते २४ रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान शहरातील नगरपालिका चौकातील, सिताराम डिलाराम किराणा मर्चंट हे दुकान हे चोरट्यांनी फोडले. किराणा दुकानाच्या शटरचा कडीकोयंडा तोडून चोरांनी वीस हजार रुपये दुकानातील गल्ल्यातून चोरून नेले. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
चोरांकडे कुलूप तोडण्याचे मशीन
विशेष म्हणजे या घटनेतील चोरट्यांकडे कुलूप तोडण्याचे मशीन असल्याचे सीसीटीव्ही दिसत आहे. तो आणखी काही दुकानांमध्ये हातसफाई करण्याच्या तयारीत होता. मात्र, गस्तीवरील पोलिसांचे वाहन आल्याने चोरटे पसार झाले. चोरट्यांकडे विनाक्रमांकाची दुचाकी होती. यावेळी पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलिस नाईक बापू पारधी, हवालदार राहुल कोळी, दीपक आहिरे, चालक अनिल वाघ यांनी कजगाव नाक्याजवळील पेट्रोल पंपापर्यंत चोरांचा पाठलाग केला. चोरटे दुचाकी सोडून पसार झाले.