मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा प्लेऑफचा दुसरा सामना लखनौ सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात कोलकत्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर खेळवण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने हा सामना १४ धावांनी जिंकला. लखनौ सुपर किंग्जने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बेंगळुरूकडून रजत पाटिदारला मिळालेल्या जीवदानांचा लाभ घेऊन त्याने १२ चौकार आणि ७ षटकारांच्या सहाय्याने ५४ चेंडूंत नाबाद ११२ धावा काढल्या. त्याने केवळ ४९ चेंडूंत शतक पूर्ण केलं. यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने ५ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने २३ चेंडूंत नाबाद ३७ धावा काढल्या. आवेश खानने विराट कोहलीला २५ धावांवर बाद केले. २०व्या षटकाच्या अखेरीस बेंगळुरू २०७/४ असे तगडे आव्हान उभे करू शकले.
लखनौचा कर्णधार के. एल. राहुलने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ३ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ५८ चेंडूंत ७९ धावा काढल्या. त्याला जोश हेझलवूडने बाद केले. झटपट धावा काढण्याच्या नादात वाणींदू हसरंगाने दिपक हुडाचा ४५ धावांवर त्रिफाळा उध्वस्त केला. मनन व्होराला १९ धावांवर जोश हेझलवूडने बाद केले. दुष्मंथा चमिरा ४ चेंडूंत ११ धावा काढून नाबाद राहिला. अवांतरच्या २२ धावांच्या जोरारावर लखनौ २०व्या षटकाच्या अखेरीस १९३/६ पर्यंत मजल मारू शकले.
त्यांच्या महत्वाच्या फलंदाजांनी आयत्यावेळी नांगी टाकली. लखनौ थेट स्पर्धेबाहेर फेकले गेले. नको त्यावेळी के. एल. राहुलचा गेलेला बळी आणि महत्त्वाच्या फलंदाजांचं अपयश लखनौला पराभूत करून गेलं. रजत पाटिदारला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने ५४ चेंडूंत नाबाद ११२ धावा काढल्या होत्या.
प्लेऑफचा तिसरा सामना उद्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत गुजरात टायटन्स विरुद्ध सामोरा ठाकणार आहे.