झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- दि.24-26 मे 2022 या कालावधीत पहिली आफ्रिकन कृषी उद्योजकता आणि प्रादेशिक बाजारपेठ ही पूर्व आफ्रिकेतील देशांची परिषद आफ्रिका दिनाच्या निमित्ताने युगांडा येथे संपन्न झाली. या परिषदेत आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया, युगांडा, रवांडा, बुरुंडी, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि दक्षिण सुदान चे प्रतिनिधी उपस्थित होते.
अशा या आंतरराष्ट्रीय परिषदेत एरंडोल नगरपालिकेला सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. यात एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.विकास नवाळे यांनी कंपोस्ट निर्मिती व त्याचे आनुषंगिक फायदे या विषयी ऑनलाइन सादरीकरण केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर न.पा कामाचे चे मॉडेल सादर करण्याची संधी प्रथमच एरंडोल न प ला मिळाली होती.
नगर परिषदेने गेल्या वर्षभरापासून शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका असे योग्य वर्गीकरण करून पद्मालय रोडवरील घनकचरा प्रकल्पामध्ये नियोजन पूर्वक प्रक्रिया चालू केलेली आहे .यातून तयार होणाऱ्या कंपोस्ट खताला महाराष्ट्र शासनाचे हरित मानांकन प्राप्त झाले असून या हरित खताची शेतकऱ्यांना नाममात्र दरांत विक्री सुरू आहे. अशाप्रकारे एरंडोल नगरपालिका उत्पन्न मिळवणारी महाराष्ट्रातील नगर पालिका आहे.
सदर सादरीकराणासाठी स्वच्छ महाराष्ट्र संचालनालय, प्रो. जि.आय.झेड इंडिया,ओंकार शौचे राज्य समन्वयक स्वच्छ महाराष्ट्र मिशन यांचे सहकार्य लाभले.