
अत्याचारामुळे मुलीने घरही सोडले होते
औरंगाबाद : – गारखेड्यातील एका मनोविकृत बापानेच स्वत:च्या मुलीवर अकरा वर्षे अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजानतेपणाच्या वयात सुरू झालेला अत्याचार वय वाढल्यानंतरही कमी होत नसल्याचे लक्षात आल्यावर तिने घरच सोडण्याचा निर्णय घेतला. ती पळून गेल्यानंतर अल्पवयीन असल्याने मुकुंदवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध घेतला. मात्र, चौकशीत तिने ११ वर्षे केलेल्या अत्याचाराची आपबिती सांगितल्यानंतर पोलिसही स्तब्ध झाले. पुंडलिकनगर पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी तत्काळ ४० वर्षीय वडिलांवर गुन्हा दाखल करत नराधम बापाला अटक केली.
१७ वर्षीय राणी (नाव बदलले आहे) आई, लहान भाऊ व आईसह गारखेडा परिसरात राहते. सध्या बारावीचे शिक्षण घेतलेल्या राणीला शिक्षणाची आवड आहे. त्यामुळे घरची परिस्थिती बेताची असली तरी दहावीनंतर एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळावा यासाठी ट्यूशन लावली. ती रोज मुकुंदवाडी परिसरात ट्यूशनला जायची. २६ मे रोजी शिकवणीला गेलेली राणी मात्र घरी परतलीच नाही. त्यामुळे घाबरलेल्या आईने मुकुंदवाडी पोलिसांकडे तक्रार केली. निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासासाठी पथके रवाना केले. पोलिसांना अंबेजोगाईत राणी मिळून आली. तिला ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी जवाब नोंदवणे सुरू केले. मात्र, गिरी यांना राणी अस्वस्थ जाणवली. त्यांनी महिला अधिकाऱ्यांना राणीकडून सत्य जाणून घेण्यास सांगितले. त्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी पळून जाण्याचे कारण विचारून संवाद साधला तेव्हा राणीने सर्व आपबिती सांगितली.
२०१३ मध्ये विकृत बापावर झाला होता गुन्हा दाखल
या बापावर २०१३ मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात त्याची तुरुंगवारी झाली. त्यात जामिनावर सुटल्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार करणे सुरूच ठेवले. तो खासगी वाहनावर चालक आहे, तर आई मजुरी करते. निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना गिरी यांच्याकडून हा प्रकार कळताच त्यांनी बापावर स्वतंत्र बलात्कार, बाललैंगिक अत्याचाराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.





