जळगाव : – इ फॉर यु अर्थात एज्युकेशन फॉर यु नावाने अनेक लोकांना जास्तीचा परतावा देण्याच्या नावाने गुंतवणूक करुन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या मुख्य संशययितास रविवारी (ता. 29) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. दिड वर्षांपासून हा घोटाळा धुळे शहरातून सुरू झाला होता. त्यात धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद येथील अनेक लोकांची फसवणूक झाली आहे.
थाटली होती कंपनी
राजकुमार नारायण पाटील (रा. कोल्हे हिल्स परिसर, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित भामट्याचे नाव आहे.राजकुमार पाटीलसह जितेंद्र बाबुराव सोनवणे (रा. पारोळा) व हिरालाल दौलत पाटील ( रा. बिलाडी रोड, देवपुर, धुळे) यांनी एज्युकेशन फॉर यु सेल्स अॅड् सव्हिसेस नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीत ठेवीदारांना मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करण्यासाठी मोठा परतावा, भेटवस्तु व आकर्षक बक्षीसे यांचे आमिष दाखविले.
ठेवीदारांची केली फसवणूक
10 लेव्हल पर्यत मेंबर करण्यास सांगितले. या आमिषांना बळी पडून ठवीदारांनी अनेक लोकांकडून पैसे घेतले. परंतु, त्यांना कोणतीही पावती देण्यात आली नाही. याशिवाय कंपनीच्या लिंकवर माहिती अपडेट ठेवली. फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ठेवीदारांनी पैशांसाठी तगादा लावला.
कंपनीला ठोकले टाळे
अडचणीत येण्याच्या भितीने भामट्यांनी कंपनी बंद करुन इंटरनेटवरुन संपुर्ण माहिती डिलीट केली. धुळे शहरात सुमारे 36 लाख रुपयांची फसवणूक त्यांनी केली होती. या प्रकरणी वर्षभरापूर्वी देवपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर हा गुन्हा तपासासाठी धुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पसार
गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य संशयित राजकुमार हा बेपत्ता झाला होता. तो जळगवातील कोल्हे हिल्स परिसरात राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी उपनिरीक्षक अमोल देव्हडे, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, विनोद पाटील, इश्वर पाटील यांच्या पथकाने रविवारी सापळा रचला. जिल्हा परिषद परिसरातून राजकुमार याला ताब्यात घेतले. यानंतर त्याला धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्ह्याची व्याप्ती वाढणार?
धुळे जिल्ह्यातून सुरू झालेल्या या फसवणूकीत राज्यातील अनेक जिल्ह्यात लोक अडकलेले आहेत. यात ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये भामट्यांनी लुबाडले आहेत. तसेच यात आणखी अनेक संशयित असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिस पथकात यांचा समावेश
पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी उपनिरीक्षक अमोल देव्हडे, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, विनोद पाटील, ईश्वर पाटील यांच्या पथकाने रविवारी सापळा रचला. जिल्हा परिषद परिसरातून राजकुमार याला ताब्यात घेतले. यानंतर त्याला धुळे पोलिसांकडे दिले आहे.