शिवरस्ता करण्यासाठी आज शेतकरी करणार आत्मदहन.

Spread the love

पूर्णा/प्रतिनिधी– तालूक्यातील पांगरा लासीना येथील विठ्ठल किशनबूवा गिरी, सुदाम किशनबूवा गिरी, शिवगिर मंगळगिर गिरी हे शेतकरी आज दि ६ जानेवारी २०२२ रोजी तरंगल-गोविंदपूर शिवरस्ता कॅनाल ते विष्णू गिरी यांच्या शेता पर्यंत पालकमंत्री पांदन मुक्ती रस्ते योजने अंतर्गत ग्रामपंचायत पांगरा ने रस्ता करण्याचे घेतले होता. तो प्रशासनाने मंजूरही केला आहे. सदर रस्ता करण्यासाठी काही शेतकरी जाणिवपूर्वक आडवणूक करीत असल्याने नाईलाजाने आत्मदहन करणार आहेत. असे निवेदन सबंधित शेतक-यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की

पूर्णा तालुक्यातील तरंगल-गोविंदपूर शेतशिवारात शिवरस्ता आहे. सदरील शिव रस्त्याचे जवळपास ७५ टक्के काम झाले आहे. गट नंबर ३५ शिवार तरंगल जवळील ५०० ते ६०० मिटर लांबी रस्त्याचे काम बाकी राहीले आहे. या शिवारात ऊसाचे मोठे क्षेत्र असून रस्त्याअभावी साखर कारखान्याकडे ऊस गाळपासाठी वाहतूक करणे ठप्प झाले असून तोड येवूनही अनेक क्षेत्र ऊस शेतातच उभा राहिला आहे. त्यामुळे वर्षभर काबाडकष्ट करुन खतापाण्याकरीता मोठा खर्च करुन ऊस जात नसल्याने सदर शेतकरी वैतागून गेले आहेत. यामुळेच ह्या शेतक-यांनी आत्मदहनाचा ठाम निर्णय घेतला आहे. या पूर्वी, तारीख २९/११/२०२१ रोजी तहसीलदार पूर्णा यांना उपोषणाचा निवेदनाद्वारे ईशारा दिला होता.त्यावरुन मंडळ अधिकारी, तलाठी यांनी येवून सदर शिवरस्ता समस्यावर तोडगा काढू असी समज देवून उपोषणाला बसू दिले नाही. परंतु तोडगा काढून रस्ता अडवणा-यांचे काहीच केले नाही. त्यामुळे अजूनही उर्वरित शिवरस्ता करु दिला नसल्याने शेतकरी परेशान आहेत. ग्रामपंचायत आजही रस्ता करण्यास तत्पर आहे परंतु काही जण अडवणूक करीत आहेत. या समस्येवर त्वरित तोडगा काढून शिवरस्ता खुला करण्यात यावा यासाठी हा आत्मदहनाचा त्या शेतक-यांचा निर्णय ठाम आहे.तसे झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहणार असल्याचे गावकरी बोलून दाखवत आहेत. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टीम झुंजार