
एरंडोल : – अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमालक, चालकाने तलाठ्यास मारहाण करुन डंपर पळवून नेल्याची घटना एरंडोल तालुक्यातील वैजनाथ शिवारात मंगळवारी दि 31 मे रोजीची घडली.
डंपरमालक बंटी विकास पाटील व चालक(नाव माहीत नाही) हे दोघे गिरण नदीपात्रातून डंपरने वाळु चोरत होते.
यावेळी अवैध वाळू वाहतूक रोखणे कामी गेलेले मंडलअधिकारी मुकेश जाधव, तलाठी दीपक नवनाथ ठोंबरे यांनी हा डंपर अडवला.तलाठी दीपक ठोंबरे यांनी वाळू वाहतूकीची पावती मागितली.पावती नसल्यामुळे डंपर एरंडोल तहसील कार्यालयात जप्त केला जाईल, अशा सूचना त्यांनी दिल्या. परंतु बंटी पाटील याने डंपर जमा न करता तलाठी ठोबंरे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करुन एम एच 19 झेड 9171 या क्रमांकाचे डंपर पळवून नेला. तुमच्याकडून काय होईल ते करुन घ्या, असे म्हणत त्यांनी कारवाईत अडथळा निर्माण केला.
या प्रकरणी बंटी पाटील व डंपरचालक या दोघांच्या विरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात 379,353,323,504,506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ए पी आय गणेश बुवा तपास करीत आहे.
एरंडोल तालुक्यात अवैध वाळू माफियासह दलालांवर कार्यवाही करण्याची गरज
तालुक्यातील हनुमंतखेडे,उत्राण,दापोरी, वैजनाथ,रवंजे रिंगणगाव,या परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांची मुजोरी वाढली आहे. अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर ट्रॅक्टर हे अत्यंत जलद गतीने आपली वाहने चालवतात त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या अवैध वाळू वाहतूक करणार्यांना नागरिकांनी हळू चालवा सांगितल्यावर त्यांच्यावरती दादागिरी करतात व मारण्याची भाषा करतात वाळू माफिया सोबत वाळूची दलाली करणार्यांवर सुद्धा कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांवर धक्काबुक्की केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस
जळगाव जिल्ह्यात गिरणा, तापी नदीकाठी अवैध वाळू उपसा सुरू आहे. अनेक माफियांची शेकडो वाहने दररोज नदीपात्र ओरबाडत आहेत. या पूर्वी वाळू माफियांमध्ये टोळीयुद्ध झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता थेट प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या अंगावर माफिया हात टाकत आहेत. यापूर्वीदेखील एक घटनेत तहसीलदार जखमी झाले होते.





