जळगाव : – तक्रारदारास गुन्ह्यात मदत करून दोषारोपपत्र लवकर पाठवण्याच्या मोबदल्यात साडेचार लाखांची मागणी करून तडजोडीअंती एक लाख रुपय स्वीकारणाऱ्या मेहुणबारे पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक योगेश जगन्नाथ ढिकले यास जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या आवारातच लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
लाचखोर फौजदार जाळ्यात
आरोपी उपनिरीक्षक योगेश ढिकले हे एका गुन्ह्यात तपास अधिकारी आहेत.
गुरनं.72/2022 अन्वये एक गुन्हा दाखल असून त्यात संशयीत आरोपी असलेल्या तक्रारदाराला गुरुवार व शनिवार हजेरी लावण्याचे आदेश असून या गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी तसेच हजेरी अॅडजस्ट करून तक्रारदाराला गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपी ढिकले याने साडेचार लाखांची मागणी केली होती व त्यात एक लाख रुपये तडजोडीअंती देण्याचे ठरले होते.
तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर लाच पडताळणी करून सापळा रचण्यात आला. गुरुवारी दोन दोन वाजता आरोपी ढिकले याने पोलिस ठाण्याच्या आवारातच लाच स्वीकारताच त्याच्या मुसक्या आवळून गुन्हा दाखल करण्यात आला. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात सहकाऱ्यांनी यशस्वी केला.