जळगाव : – गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातच जळगाव जिल्ह्यातही गुरुवारी दोन रुग्ण बाधित आढळून आले आहे. मुंबई पुन्हा एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. मुंबई येथून दररोज हजारो नागरिक जळगाव जिल्ह्यात येत असतात. त्यामुळे जिल्ह्यातही कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे.
गुरुवारी जळगाव जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी एक रुग्ण जळगाव शहरातील आहे. तर एक रुग्ण चोपडा तालुक्यातील आहे. गेल्या आठवड्यातील एक रुग्ण देखील अजून सक्रिय असून सध्या तीन रुग्णांवर उपचार सुरु आहे. कोविड बाधित आढळलेल्या रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून संपर्कातील नागरिकांनी मात्र तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मास्क वापरण्याचे आवाहन
जळगाव शहरात आढळून आलेला 40 वर्षीय कोरोना बाधित व्यक्ती हा गणपती नगरातील असून संबंधित रुग्णाची कोणत्याही प्रकारची ट्रॅव्हल्स हिस्ट्री नसतानाही त्यांना कोविडची लागण झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोविड नियंत्रणात असला तरी शहरात सायलेंट कॅरिअर्स असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात कोविड रुग्णांमध्ये संथगतीने वाढ होत असून मुंबई आणि पुण्यात राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी आढळत आहे. आरोग्य विभागाने मास्कच्या वापराबाबत आवाहन केले आहे.