धक्कादायक : लग्नानंतर सहाव्या दिवशी एकमेकांना फोन करुन प्रियकरासोबत केली आत्महत्या.

Spread the love

सांगली :- सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे प्रकरण वाढतच चालली आहे अश्यातच सांगली जिल्ह्यात प्रेमी युगुलाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जत तालुक्यातील एकुंडी या गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे लोक हळहळ व्यक्त करत आहेत. अश्विनी गजानन माळी आणि लक्ष्मण संभाजी शिंदे अशी मृत प्रेमी युगुलाची नावं असून एकमेकांना फोन करुन दोघांनीही आपापल्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, मृत अश्विनी हीचा सहा दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र अश्विनी आणि लक्ष्मण या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. या दोघांचे प्रेमसंबंध कुटुंबियांना पसंत नव्हते त्यामुळे अश्विनीच्या कुटुंबियांनी तिचा विवाह सलगरे इथल्या तरुणाशी करुन दिला होता. लग्नानंतर ती रविवारी (5 जून) एकुंडी इथे माहेरी आली असता सोमवारी (6 जून) रोजी सकाळी अश्विनी आणि लक्ष्मण यांनी एकमेकांना फोन करुन आत्महत्या करण्याचं ठरवलं. यानंतर दोघांनीही आपापल्या घरी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, विष प्यायलानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास अश्विनी आणि लक्ष्मणला अस्वस्थ वाटू लागले. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपाचारपूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या दोन्ही घटनांची नोंद जत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

टीम झुंजार