जळगाव :- मध्यरात्री घराबाहेरुन ट्रॅक्टर चोरून पळून जात असलेल्या चोरट्याचा गावातील काही तरुणांनी 7 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. ही बाब लक्षात येताच चोरट्याने जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात ट्रॅक्टर रिव्हर्स घेऊन तरुणांना चिरडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात तरुण बचावले. तरुणांनी चोरट्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. रविवारी मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. अतुल दिनकर सपकाळे यांच्या मालकीचे हे ट्रॅक्टर आहे. तसेच राकेश अंजनिया चव्हाण असे चोरट्याचे नाव आहे.
चोरट्याने काढला पळ
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, रविवारी मध्यरात्री एक वाजता राकेश याने अतुलच्या अंगणात उभे असलेले ट्रॅक्टर सुरू करून पळ काढला. गावातील काही तरुणांना हे ट्रॅक्टर अतूलचे असल्याचे समजले. पण चालवणारा तरुण अनोळखी असल्याने त्यांना संशय आला. या तरुणांनी तोबडतोब अतुलला फोन करुन माहिती दिल्यानंतर ट्रॅक्टर कोणीतरी चोरुन नेत असल्याचे सांगितले.
चोरट्याला दिला चोप
अतुलसह पंकज सपकाळे, भूषण सपकाळे, शुभम सोनवणे, अमोल सपकाळे, देवेंद्र सपकाळे, चेतन सोनवणे, अजय तायडे, राहुल कोळी यांच्यासह काही तरुणांनी दुचाकी, चारचाकीने ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू केला. तरुणांनी रस्त्याच्या कडेला मिळेल त्या जागेवर आश्रय घेतल्यामुळे सुदैवाने हे तरुण वाचला. यानंतर तरुणांनी चोरट्यास पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. सोमवार 13 जून रोजी पहाटे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राकेशला अटक केली आहे.