
बेटावद : – माऊली सेवा संस्था, शिरपूर या सेवाभावी संस्थेच्या बेटावद येथील शाखेत मार्फत १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन व आत्मविश्वास जागृत करणारा कार्यक्रम दिनांक ११ जून २०२२ रोजी जनता शिक्षण संस्थेच्या प्रांगणात घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नरडाणा पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक श्री मनोज ठाकरे साहेब तर प्रमुख वक्ते म्हणून करियर मास्टर डॉ. शिवशंकर बागुल सर व राष्ट्रीय प्रबोधनकार प्रा. गणेश पाटील सर तसेच संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक आबासो श्री. एस. पी. माळी सर शिक्षण क्षेत्रातील मान्यवर श्री. डी. जी. पवार सर, श्री. अमोल सूर्यवंशी सर तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्रभाऊ कोळी, श्री. महेंद्रभाऊ माळी, श्री. महेंद्र देशमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे दैवत विठू माऊलींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकात संस्थेचे सल्लागार श्री. योगेश माळी यांनी सांगितले की, माऊली सेवा संस्था गाव खेड्यातील शेतकरी, कष्टकरींच्या मुला-मुलींना मदत, प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठी सुरू करण्यात आली असून आजचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या वाटा बाबत मार्गदर्शन व्हावे व न्यूनगंड दूर सारून आत्मविश्वास जागृत करणारा आहे.
एकादशीच्या दिवशी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार पारंपरिक पद्धतीने न करता बागायतदार उपरणे व टोपी परिधान करून करण्यात आला हे कार्यक्रमाचे विशेष होते.

करियर मार्गदर्शन डॉ. बागुल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, दहावी व बारावी नंतर शिक्षण क्षेत्रात नव नवीन असंख्य वाटा आहेत. पारंपरिक वाटेने न जाता नव्या वाटांवर मार्गक्रमण केल्यास नक्कीच आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करून कर्तृत्व सिद्ध करता येईल. यावेळी अनेक वेबसाईट व प्रशिक्षण संस्थाची माहिती दिली.

राष्ट्रीय प्रबोधनकार प्रा. गणेश पाटील यांनी “हम होंगे कामयाब” या कार्यक्रमाअंतर्गत गाव खेड्यातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड दूर सारून आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास जगातील कोणत्याही क्षेत्रात तुम्ही उंच भरारी मारू शकतात. हुशारीपेक्षा आत्मविश्वासामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होता येते हे अनेक उदाहरणाच्या आधारे स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात सहा. पोलिस निरीक्षक श्री. ठाकरे यांनी स्पर्धा परिक्षेत खेड्यातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढला पाहिजे यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशिल आहोत. याच दिशेने माऊली सेवा संस्थेची होणारी वाटचाल कौतुकास्पद आहे.
कार्यक्रम प्रसंगी मा. ठाकरे साहेबांच्या हस्ते जनता शिक्षण प्रसारक संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे दमदार असे सूत्रसंचालन आबासो. श्री. के. एस. पाटील यांनी केले. तर आभार माऊली सेवा संस्थेचे संयोजन समिती प्रमुख श्री योगेशभाऊ बाविस्कर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जनता शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक शाळेचे उप मुख्याध्यापक श्री. पवार सर व चौधरी सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.





