आमदार सावकारे यांचा सवाल: ट्रॅफिक विभाग वाहतूक सुरक्षित करण्यासाठी की वसुलीसाठी?

Spread the love

जळगाव :- एका बाजूला वाहतूक कोंडी झालेली असताना वाहतूक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करून वाहनचालकाकडे कागदपत्रे तपासून वसुली करतात. त्यांना विचारले असता आम्हाला वरुन टार्गेट देण्यात आले असल्याचे सांगतात, त्यांना कोणी टार्गेट दिले आहे का? असा सवाल माजी पालकमंत्री भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. या प्रश्नी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढील आठवड्यात बैठक घेण्याची सूचना देत विषयावर तात्पुरता टाळला.

शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात बैठक झाली. शहराच्या एन्ट्री पॉईटवर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. ती सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक असताना ते कोंडी सोडविण्याएवजी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची कागदपत्रे तपासून दंड वसुली करतात. त्यांना असे काही टार्गेट दिले आहे. ते कोणी दिले आहे, असा सवाल आमदार सावकारे यांनी यावेळी उपस्थित केला. महामार्गावर वेग मर्यादेचे फलक नसताना वाहतूक पोलिसांकडून वेग मर्यादा तोडल्याबाबतही दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टोलच्या माध्यमातून लुट

यावेळी सावकारे यांनी चिखली ते तरसोद दरम्यान महामार्गाचे चौपदरीकरण झालेले नसताना मक्तेदाराकडून टोल वसुली केली जात आहे. त्याबाबत फलक लावून महिन्याची पास काढण्याबाबत जाहिर सूचना लावण्यात आल्याचे सांगितले. ही वसुली ताबडतोब बंद करण्याची मागणीही यावेळी केली.

पुढील आठवड्यात बैठक

वाहतूक पोलिसांच्या वसुली व महामार्गावरील टोल वसुली या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, न्हाईचे अधिकारी यांची संयुक्त बैठक लावण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले.

टीम झुंजार