जळगाव :- कुटुंबीयांसोबत रात्री 9.30 वाजता जेवण करुन घराबाहेर पडलेल्या एका तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी दुपारी ममुराबाद शिवारातील एका विहिरीत आढळुन आला. या तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
दीपक खुशाल पाटील (वय 32, रा. चौगुले प्लॉट) असे मृत तरुणाचे नाव आहे. दीपक एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता.
घटना अशी की, शुक्रवारी रात्री 9.30 वाजता दीपकने कुटुंबीयांसोबत जेवणे केले. यानंतर तो दुचाकी घेऊन घराबाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. परिसरातील नागरीक, मित्रांकडे जाऊन चौकशी केली. शनिवारी सकाळी पुन्हा एकदा शोध मोहिम सुरू केली. यावेळी दीपकची दुचाकी ममुराबाद शिवारातील नारायण झिपरु फेगडे यांच्या शेतातील विहिरीजवळ मिळुन आली.
कुटुंबीयांना प्रचंड धक्का
दुचाकीवर त्याचा मोबाइलही ठेवलेला होता. दीपकने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय बळावला. यामुळे तालुका पोलिसांनी पट्टीच्या पोहोणाऱ्यांना विहिरीत उतरवले. दुपारी 3.30 वाजता या लोकांनी विहिरीतून दीपकचा मृतदेह बाहेर काढला. हे दृष्य पाहुन कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. दीपकने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मृत दीपकच्या पश्चात आई, पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साहेबराव पाटील तपास करीत आहेत.