पोहण्यासाठी गेलेला तरुण नदीत बुडाला; 15 तासांनी सापडला मृतदेह.

Spread the love

जळगाव :- मित्रांसोबत गिरणा नदीत पोहोण्यासाठी गेलेला तरुण पाण्यात बुडाला होता. या तरुणाचा मृतदेह तब्बल 15 तासांनी पाण्यावर तरंगताना आढळुन आला. शनिवारी सकाळी 6.30 वाजता पोलिसांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. रोहन मोहन कसोटे (वय 21, रा. म्युनिसीपल कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. रोहनचे वडील मोहन कसोटे हे महापालिकेत आरोग्य विभागात नोकरीस आहेत. तर रोहन देखील हातमजुरी करीत होता.

घटना अशी की, रोहन व परिसरातील काही मित्र शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता गिरणा नदीपात्रात वैजनाथ गावाच्या बाजूने पोहोण्यासाठी गेले होते. रोहनला पोहता येत नव्हते मात्र तोही त्याच्या इतर मित्रांसोबत तो नदीपात्रात उतरला. दरम्यान, पाण्याचा प्रवाहाने जोर पकडल्यामुळे रोहनला अंदाज आला नाही. त्यामुळे तो पाण्यात वाहून गेला. शेजारी पोहत असलेल्या मित्रांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी रोहनला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो पाण्यात बुडाला होता. ही घटना कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. मित्रांनी रोहनच्या कुटुंबीयांना घटना कळवली.

15 तासांनी मृतदेह आढळला

सामाजिक कार्यकर्ते पिंटू तायडे, पराग बोभळे, राजू चावरे, दत्तू कोळी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अग्निशमन विभाग तसेच तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारीही पोहोचले. अग्निशमन विभागाचे वाहनचालक देविदास सुरवाडे, फायरमन वसंत कोळी, रोहिदास चौधरी, सरदार पाटील यांनी शोधमोहिम सुरू केली होती. रात्री उशिरापर्यंत पथकाने शोध घेतला पण रोहन आढळुन आला नाही. अखेर शनिवारी सकाळी 6.30 वाजता म्हणजेच घटनेच्या तब्बल 15 तासानंतर रोहनचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळुन आला. पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढून कुटुंबींयाना ओळख पटवण्यासाठी बोलावले. मृतदेह रोहनचाच असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर शवविच्छेदन करुन दुपारी रोहनचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला. मृत रोहन याच्या पश्चात आई प्रेमा, वडील मोहन कसोटे, दोन मोठे व एक लाहन भाऊ असा परिवार आहे. मिळेल ते काम करुन रोहन कुटुंबीयांना हातभार लावत होता.

टीम झुंजार