मुंबई :- एकीकडे मुंबईत शिवसेनेचे मेळावे सुरू असताना दुसरीकडे पक्षातील गळती मात्र थांबण्याचं नाव घेत नसल्याची स्थिती आहे. त्यातच आणखी एका मंत्र्याने बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.
आमदारांच्या बंडखोरीमुळे हैराण झालेल्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. कारण शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत हेदेखील बंडखोर गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या बंडखोरांच्या गटात सामील झालेले उदय सामंत हे शिवसेनेचे आठवे मंत्री आह.
आमदारांना मिळणाऱ्या निधीपासून हिंदुत्वाच्या विचारधारेपर्यंत विविध कारणे देत शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी पक्षनेतृत्वाविरोधात बंड केलं आहे. हे सर्व बंडखोर आमदार आधी सूरत आणि त्यानंतर आसाममधील गुवाहाटी येथे वास्तव्यास आहेत. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत युती करावी, अशी या आमदारांची मागणी आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर शिवसेनेच्या उर्वरित नेत्यांसह रस्त्यावर उतरत या बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आपला रोष व्यक्त करत आहेत. मुंबईत शिवसेनेकडून विविध मिळावेही घेतले जात आहेत. मात्र एकीकडे हे मेळावे सुरू असताना दुसरीकडे पक्षातील गळती मात्र थांबण्याचं नाव घेत नसल्याची स्थिती आहे.
शिवसेनेतील नाराज आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे गायब झाल्यानंतरही उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्याबाबतही कुजबूज सुरू झाली होती. अखेर आज ते गुवाहाटीकडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत.