“शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्याचं स्वीकारा,” शिंदे गटाचा शिवसेनेला सल्ला; म्हणाले “उद्धव ठाकरेंची प्रतिमा…”

Spread the love

शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा सर्व शिवसैनिकांना अभिमान आहे. सर्वांनी ती व्यक्तही केली आहे. पण उद्धव ठाकरेंच्या आजुबाजूला असणारे लोक दिशाभूल करत आहेत. तोंडघशी पडण्याचा प्रकार का करत आहात? शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे हे स्वीकारलं पाहिजे असा सल्ला एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

“अशी कोर्टबाजी करण्यात काही अर्थ नाही हे त्यांनाही माहिती आहे. पण कुठेतरी आडवायचं यासाठी सुरु आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा खराब होत आहे,” असंही ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत. यावेळी अरविंद सावंत यांनी अपात्रतेसंदर्भातील याचिका प्रलंबित असताना शपथ कशी काय दिली? असा प्रश्न विचारला आहे. कोणता पक्ष म्हणून त्यांना बोलावण्यात आलं होतं असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे

पुढे बोलताना ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंचा स्वभाव आम्हाला माहिती आहे, त्याबद्दल नाराजी नाही. पण इतरांकडून मुडदे, नालेसफाई, शवविच्छेदन असे अनेक उल्लेख कऱण्यात आले. कामाठीपुरात गळ्यात पाट्या घालून बसा ही तुमची भाषा होता हे तुम्ही का विसरता? कोणताही चांगला माणूस ही भाषा स्विकारेल”. सर्व वाद संपले पाहिजेत आणि त्यासाठी सहकार्य केलं पाहिजे असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं आहे.

शिवसेनेची सुप्रीम कोर्टात याचिका –

बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे येत्या ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन पाचारण करण्यात आलं असून त्यामध्ये राज्य सरकार बहुमत सिद्ध करणार आहे. याविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. पण सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. ११ जुलैलाच सुनावणी होईल असं कोर्टाने सांगितलं आहे.

टीम झुंजार