मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शिवसेनेची सर्वात मोठी कारवाई; नेतेपदावरून हकालपट्टी.

Spread the love

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. शिंदे यांची नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. कारवाईचं पत्र शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंना पाठवण्यात आलं आहे.

मुंबई: – पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं. शिवसेनेचे ३९ आमदार त्यांच्यासोबत आहेत. यानंतर शिंदे गटानं पक्षावरच दावा सांगितला. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा उल्लेख शिवसेनेनं शिंदेंना पाठवण्यात आलेल्या पत्रात केला आहे.

शिवसेनेच्या घटनेत “शिवसेना प्रमुख” हे पद सर्वोच्च आहे आणि फक्त शिवसेना पक्षप्रमुखांनाच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संगनमताने कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लिलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन किर्तीकर हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ठरावानुसार ९ जण पक्षनेते आहेत. यापैकी सुधीर जोशी यांचं निधन झालं आहे. तर, उद्धव ठाकरेंनी पक्ष प्रमुख या अधिकारात चार जणांची पक्षनेते म्हणून नियुक्ती केली होती.

या चार जणांची नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. त्यामध्ये अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे यांची नियुक्ती ठाकरेंनी केली आहे. आता पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ठाकरेंनी शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.

टीम झुंजार