???????? दिंडी सोहळा व अभंग गायन कार्यक्रम सांगवी आश्रमशाळेत उत्साहात साजरा????????

Spread the love



सांगवी ( शिरपूर ) : – प.खा.भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सांगवी ता.शिरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळा व अभंग गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. मोतीरामजी महाराज सांगवीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून संगीतविशारद श्री.चिंतामण मास्तर , मृदुंगाचार्य महारुभाऊ , पालखीचे शिल्पकार संजयभाई डेडियापाडा हे उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांसह माध्यमिक मुख्याध्यापक श्री. विठोबा चौधरी सर , प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती काश्मिरा पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन व ग्रंथपूजन करण्यात आले. दिंडी सोहळ्यासाठी आकर्षक अशी पालखी बनविण्यात आली होती.

या पालखीतून श्री विठ्ठल रुखमाई व ग्रंथ यांची दिंडी सांगवी गावात फिरविण्यात आली. विठूनामाच्या गजराने संपूर्ण सांगवी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. घरोघरी पालखीचे पूजन करून गावकऱ्यांनी दिंडीचे स्वागत केले.


संपूर्ण गावात दिंडी फिरून समारोप सांगवी आश्रम शाळेच्या प्रांगणात करण्यात आला. तद्नंतर आश्रमशाळेत अभंग गायन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मराठी विभागाचे श्री. योगेश माळी सरांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी , त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा हाच या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे मत व्यक्त केले. पारंपरिक वेशभूषा परिधान करून विद्यार्थीनीं चंद्रभागेच्या तिरी, धरीला पंढरीचा चोर, पाऊले चालती पंढरीची वाट, येई ग विठाई , माहेरी कुठवर राहू राहू, माऊली माऊली या अभंगांचे सुमधुर आवाजात तालासुरात गायन केले. हार्मोनियम वादक चिंतामण दादा व मृदुंग वादक महारु भाऊंनी अभंगाला साथ दिल्याने भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली.


अध्यक्षीय भाषणात ह.भ.प. मोतीराम महाराज यांनी अभंगाचे आपल्या जीवनातील स्थान या विषयावर विचार व्यक्त करत अतिशय सुमधुर आवाजात अभंगाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका श्रीमती मिनाक्षी पाटील यांनी तर पाहुणे परिचय श्री.विलास मराठे सरांनी यांनी केले.

आभार उपशिक्षक श्री. कल्पेश मावची यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाषा मंडळाचे उपाध्यक्ष श्री. सुहास पाटील यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार