चोपडा (वार्ताहर)डाॅ. सतीश भदाणे : येथे ११ जुलै रोजी खान्देश भूगोलशास्त्र मंडळ आणि भूगोलशास्त्र विभाग, महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयामार्फत आभासी पद्धतीने जागतिक लोकसंख्या दिनाचे आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी तर खान्देश भूगोलशास्त्र मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. एन भारंबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील भूगोल विभाग प्रमुख डॉ. मदनलाल व्हि. सूर्यवंशी तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून संयोजक डॉ. शैलेश वाघ, उपप्राचार्य व विभाग प्रमुख प्रा. एन. एस. कोल्हे आभासी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी विभाग प्रमुख प्रा. एन. एस. कोल्हे यांनी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचे औचित्य त्यामागची पार्श्वभूमी काय? हे आपल्या प्रास्ताविकातून विषद केले. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांशी हितगुज करताना डॉ. मदनलाल सूर्यवंशी म्हणाले की लोकसंख्या वाढ ही संपूर्ण जगासाठी एक आव्हान बनलेले आहे. लोकसंख्या वाढीचा इतिहास बघता लोकसंख्या वाढीचा वेग हा संपूर्ण जगाला विचार करायला भाग पाडणारा आहे. सततच्या वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे संपूर्ण जगात विशेषतः भारतात मूलभूत गरजांवर मोठा ताण निर्माण झालेला आहे. मानवाच्या प्राथमिक गरजा अन्न, पाणी, निवारा यासारख्या देखील पूर्ण होण्यास अनेक अडचणी निर्माण झालेल्या दिसून येत आहेत.
वाढत्या लोकसंख्येमुळे पुरेसे अन्न, शुद्ध पाणी याची देखील अनियंत्रित समस्या भविष्यात अधिक तीव्र होणार आहे. मूलभूत गरजांची अपूर्णता ही देशातील व समाजातील नागरिकांना विध्वंसक कार्याला उद्युक्त करते. याउलट ज्या समाजातील व देशातील नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होत असल्यास ते नागरिक सशक्त समाज व देश घडवितात म्हणून संपूर्ण जगाला व विशेषतः लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताला या लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या विविध आपत्ती किंबहुना संकटांची सखोल चिंतन मनन करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणाऱ्या स्थलांतरामुळे शहरी भागात मोठ्या प्रमाणात निवाऱ्याची समस्या निर्माण होऊन झोपडपट्टीची निर्मिती होण्यास हातभार लागत आहे.
आज देखील भूक ही समस्या भारतात प्रकर्षाने जाणवत असून अन्नाची पोषकता प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून देशातील अन्नाची वाढती गरज व तिची पूर्तता करण्यासाठी घेतले जाणारे संकरित उत्पादन नागरिकांच्या आरोग्याची समस्या तीव्र करणारे आहे. प्राकृतिक अनुकूलतेचा देखील लोकसंख्या वाढ व घनतेवर परिणाम होताना दिसून येतो. अनुकूल प्राकृतिक प्रदेशात लोकसंख्या जनतेचा बोजा जास्त असल्याने तेथील पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण होऊन पायाभूत सुविधांच्या पूर्तता करणारी व्यवस्था कोलमडते. याप्रमाणे वाढती लोकसंख्या ही कोणत्याही देशासाठी आपत्ती हून कमी नाही. परंतु लोकसंख्या वाढ ही केवळ नकारात्मक बाब नसून सकारात्मक दृष्टीने देखील त्याकडे पाहिले पाहिजे. देशातील लोकसंख्या ही सर्वाधिक अनमोल संसाधन म्हणून ओळखले जाते. या मानव संसाधनाचा देशाच्या विकासात खूप मोठा सिंहाचा वाटा असतो.
त्यासाठी मात्र केवळ संख्यात्मक लोकसंख्या असून भागत नाही तर ती लोकसंख्या गुणात्मक दृष्ट्या सक्षम असावी जेणेकरून त्यांच्या हातून देश विकासाचे विधायक कार्य घडून येईल. वाढत्या लोकसंख्येच्या आधारावर भारत आज जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो त्यामुळेच जगातली सर्वात मोठी बाजरपेठ म्हणून जगातील प्रत्येक देश भारतात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सजग असतो. ज्यातून वाढत्या लोकसंख्येला मोठा रोजगार उपलब्धतेची संधी प्राप्त होते. याप्रमाणे वाढती लोकसंख्या संपत्ती की आपत्ती यावर गंभीर विचार करण्याची वेळ कधीच येऊन ठेपलेली आहे, असे प्रतिपादन डॉ. मदनलाल सूर्यवंशी यांनी केले.
सदर जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित आभासी कार्यक्रमात महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विद्यापीठ परिक्षेत्रातील भूगोल प्राध्यापक, भूगोल प्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते, तसेच महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक वर्ग व उपप्राचार्य हेदेखील आवर्जून या कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. शैलेश वाघ यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मुकेश पाटील व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
आपण या बातम्या वाचल्या का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






