जळगाव :- सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगावात एक धक्कादायक घटना समोर आलीय. मुले अभ्यास करत असताना दुसरीकडे मुलांच्या पाठीमागे पलंगावर झाेपलेल्या त्यांच्या वडिलांनी काही क्षणातच पंख्याला रुमाल बांधून गळफास घेत आत्महत्या केली. समाधान रामदास सुरवाडे (वय ४५, रा. काळेनगर, शिवाजीनगर) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, भेदरलेल्या मुलांनी घराबाहेर जाऊन ही घटना परिसरातील नागरिकांना सांगितली. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.
सुरवाडे यांना दम्याचा आजार हाेता. त्यामुळे ते प्रचंड त्रस्त झाले होते. सोमवारी दुपारी त्यांनी त्यांच्या वृद्ध आईस बाहेरून काहीतरी खाद्यपदार्थ आणण्यासाठी पाठवले. यावेळी घरात त्यांची मुले प्रेम व करण हे दाेघे अभ्यास करीत बसले होते. त्यांच्या पाठीमागे सुरवाडे हे पलंगावर झोपले होते. काही क्षणातच सुरवाडे यांनी पंख्याला रुमाल बांधून गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी झालेल्या आवाजामुळे दोन्ही मुलांच्या लक्षात हा प्रकार आला. वडिलांनी गळफास घेतल्याचे दृश्य पाहून दोघे मुले भेदरली, घराबाहेर येऊन त्यांनी परिसरातील नागरिकांना ही बाब सांगितली. शिवसेनेचे शिवाजीनगर विभागप्रमुख विजय बांदल यांच्यासह काही लोकांनी सुरवाडे यांच्या घरी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी ओमप्रकाश सोनी, नितीन अत्तरदे व दिनेश कंखरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दुपारी ३ वाजता मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. यावेळी नातेवाइकांनी अाक्राेश केला. मृत सुरवाडे यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती नातेवाइकांनी दिली आहे. मृत सुरवाडे यांच्या पश्चात पत्नी राधिका, आई, मुले भारत, प्रेम व करण असा परिवार आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






