झुंजार । प्रतिनिधी
कासोदा :- सोळा गाव पाणी पुरवठा योजनेचे अंतुर्ली ता. एरंडोल शिवारातील जलशुद्धीकरण केंद्र व पाण्याची टाकी असून ती गेल्या एक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे दि. ११ जुलै २०२१ ते ११ जुलै २०२२ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी एकूण २ लाख ५८ हजार किंमच्या इलेक्ट्रीक मोटर्स व स्टार्टरची चोरी झाल्याचे लक्षात आल्याने कासोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या बाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार कासोदा व परिसरातील सोळा गावांना पाणी पुरवठा व्हावा यासाठी शासनाकडून सोळा गाव पाणी पुरवठा योजना राबवण्यात येत होती परंतु काही कारणास्तव ही योजना गेल्या एक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. सदर ठिकाणी कोणीच गेले नसल्याने दि. ११ जुलै २०२२ रोजी शिखर समितीचे अध्यक्ष तथा वनकोठे गृप ग्रा. पं. चे सरपंच उमेश श्रीराम पाटील व शिखर समितीचे सचिव तथा कासोदा ग्रा. पं. चे उपसरपंच शेख अब्दुल अजीज बारी यांचेसह या योजनेचे सदस्य दिनेश जगन्नाथ आमले रा जवखेडा,भाईदास मोरे रा तळई हे पाहणीसाठी गेले असता
सदर जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा होणाऱ्या ८ इलेक्ट्रीक मोटर्स व एक इलेक्ट्रीक स्टार्टर असा एकूण २ लाख ५८ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे लक्षात आल्याने वनकोठे गृप ग्रा. पं. चे सरपंच तथा शिखर समितीचे अध्यक्ष उमेश श्रीराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात दि. १६ जुलै २०२२ रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. नंदलाल पाटील, पो. काँ. जितेश पाटील, समाधान तोंडे, इम्रान खान, प्रवीण हटकर हे करीत आहेत.
दरम्यान एरंडोल तालुक्यासह कासोदा परिसरात इलेक्ट्रीक मोटर्स,इलेक्ट्रीक स्टार्टर,केबल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.या वाढत असलेल्या चोरी मुळे पोलीस प्रशासनाला आव्हान निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने या चोरट्यांना लवखर जेरबंद करावे ही अपेक्षा आहे. नेहमी चर्चेत असलेली सोळा गाव पाणी पुरवठा योजना ही आता झालेल्या चोरीमुळे चर्चेत राहणार आहे.










