जळगाव :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे अश्यातच आदित्य ठाकरे ( Aditya Thakrey)आता महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत, पण हाच महाराष्ट्र दौरा जर सत्तेत असताना केला तर असता तर आज ओढावलेली परिस्थिती टळली असती, असा टोला लगावतानाच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) शाखांवर फिरावं लागतं यासारखं दुर्दैव नाही, असं टीकास्त्र गुलाबराव पाटलांनी सोडलं. शिंदे गटाला रोखण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे मुंबईतील शिवेसना शाखांना भेटी देत आहेत, तर आदित्य ठाकरे यांच्याही उपनगरांत सभा पार पडत आहेत. ठाकरे बाप लेकाच्या दौरे-सभांवर गुलाबराव पाटलांनी टीका केलीये.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज नाशिकच्या मनमाड येथे पोहोचली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. गद्दारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. कारण गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार आणि त्यांची तेवढी लायकीही नसते, अशा घणाघाती शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवार प्रहार केला. याच सगळ्या पार्श्वभूमीवर जळगावातील पत्रकारांनी गुलाबराव पाटलांना प्रश्न विचारले. यावेळी गुलाबराव पाटलांनी ठाकरे बापलेकांवर टीका केली.
गुलाबराव पाटील म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी असेच महाराष्ट्र दौरे पूर्वी केले असते, तर आज आलेले दिवस त्यांच्यावर आले नसते. आमचं हेच म्हणणं होतं आणि विधानसभेच्या भाषणातही हेच बोललो की, उद्धव ठाकरेंची तब्येत खराब होती, पण आपण ३० वर्षांचे तरुण होतात. जर आपण राज्यभर शिवसेनेसाठी दौरा केला असता तर आपल्यावर आज आलेली वेळ आली नसती. आज उद्धव ठाकरे यांना शाखेवर जावं लागतंय, ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. आज त्यांना विनामास्क शाखेवर जावं लागतंय, ही वाईट परिस्थिती आहे”
“ठाकरे बापलेकांनी असे दौरे आधी केले असते तर शिवसेना आणखी मजबूत झाली असती. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार मजबूत झाला असता. याचसाठी आम्ही सगळ्या ४० आमदारांनी उठाव केला. यानिमित्ताने मी खात्री देतो, शिवसेनेला गतवैभव पुन्हा प्राप्त करु”, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
बंडखोरांनी राजीनामे द्यावे, या आदित्य ठाकरे यांच्या चॅलेंजला उत्तर देताना पाटील म्हणाले, “आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ओरिजिनल शिवसैनिक आहोत. त्यामुळे आमच्या राजीनाम्याचा विषयच येत नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसैनिकाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही. राज्याचा विकास करणं हा आमचा ध्यास आहे, कार्यकर्त्यांची रखडलेली कामं करणं हा आमचा प्रयत्न असेल”