पेट्रोलिंग करणारे पोलिस असताना अशा घटना घडतात तरी कशा ?
प्रतिनिधी : संजय वायकरनगर : ११ / भाजी मार्केटमध्ये पहाटेच्या सुमारास चाललेल्या भाजी विक्रेत्यास दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी अडवून कोयत्याने वार करत लुटल्याची घटना नगर शहरात सोमवार दि. १० रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास कोर्टगल्ली येथील दादा चौधरी विद्यालय येथे घडली. सदर घटनेत बाळासाहेब उर्फ सतीष नारायण तरोटे ( वय ५९, रा. सातभाईगल्ली, चितळेरोड ) हे गंभीर जखमी झाले आहेत. सतीष तरोटे हे भाजी विक्रेते असून नेहरू मार्केट येथे गेल्या अनेक वर्षांपासून भाजी विकतात.
नेहमीप्रमाणे भाजी विक्री करणेसाठी पहाटे ५.३० च्या सुमारास ते घरुन भाजीपाला आणण्यासाठी निघाले. कोर्टगल्लीतील दादा चौधरी विद्यालयसमोरून जाताना दुचाकीवर तीन युवक आले . त्यांनी तरोटे यांना पाठीमागून धडक देत रस्त्यावर खाली पाडले. त्यावेळी त्यांच्यात आणि त्या युवकांमध्ये बाचाबाची झाली. या दरम्यान एका जणाला त्यांनी पकडले. यावेळी एकाने तरोटे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावुन घेतली . तरोटे हे पकडून ठेवलेल्या युवकाला सोडत नसल्याने त्यांच्या दोन्ही हातावर चोरट्यांनी कोयत्याने वार केले. परिणामी तरोटे गंभीर जखमी झाले. या संधीचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले.
याबाबत सतीष तरोटे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भा.दं.वि.क. ३९४, ३९७ अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कोतवाली पोलिस करत आहेत .चौकटनगर शहरात रोज रात्री पोलिसांकडून पेट्रोलिंग केले जाते . असे असतानाही चोरीच्या घटना घडत आहेत . चोरटे जीवघेणा हल्ला करून नागरिकांना लुटत आहेत . पेट्रोलिंग करणारे पोलिस असताना सुद्धा अशा घटना घडतात तरी कशा अशी उलट सुलट चर्चा नागरिक करत आहेत .