भारताचा वेस्ट इंडिजवर ८८ धावांनी विजय मालिकेत ४-१ विजय

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाची धुरा वाहणार्‍या हार्दिक पांड्याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी डावाची सुरूवात केली. दोघेही चांगली धावगती ठेवत असतानाच डॉमनिक ड्रेक्सने ईशानला ११ धावांवर बाद केले. दीपक हुडासोबत अय्यरची जोडी मस्तच जमली. डावाच्या १०व्या षटकाच्या सुरूवातीलाच त्यांची अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली आणि त्याच षटकात अय्यरने वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले.

पुढच्याच षटकात भारतीय संघाचं शतक धावफलकावर झळकलं. मस्त जमलेली ७६ धावांची खेळी हेडन वॉल्शने भेदली. त्याने हुडाला ३८ धावांवर बाद केलं. पुढच्याच षटकात जेसन होल्डरने अय्यरला ६४ धावांवर बाद केलं. संजू सॅमसनला १५ धावांवर ओडियन स्मिथने बाद केले. वेस्ट इंडिअन गोलंदाजांनी टिच्चून मारा करत धावगती रोखली. ओडियन स्मिथने दिनेश कार्तिकला १२ धावांवर पायचीत टिपले. ओडियन स्मिथच्या पुढच्याच षटकात हार्दिक पांड्या २८ धावांवर धावचीत तर अक्षर पटेल ९ धावांवर झेलबाद झाले. २०व्या षटकाच्या अखेरीस भारतीय संघाची धावसंख्या १८८/७ अशी झाली.

वेस्ट इंडिजकडून डावाची सुरूवात करण्यासाठी जेसन होल्डर आणि शामराह ब्रुक्स यांनी केली. पण अक्षर पटेलने होल्डरला शून्य धावांवर परत पाठवले. ब्रुक्स लयीत येत असतानाच अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिक त्याला यष्टीचीत केले. त्याच षटकात अक्षरने देवॉन थॉमसचा त्रिफाळा उध्वस्त केला. वेस्ट इंडिजच्या ५० धावा पूर्ण झाल्या आणि कुलदीप यादवने पुरनला पायचीत टिपले. शॅमरॉन हेटमायर आणि रावमन पॉवेल हळूहळू धावगती वाढवू लागले.

हेटमायर एका बाजूने किलचला लढवत होता आणि दुसर्‍या बाजूने गडी बाद होत होते. रवी बिष्णोईने लागोपाठच्या चेंडूंवर पॉवरल आणि पॉलला माघारी धाडले. तर पुढच्याच षटकात कुलदीप यादवने ड्रेक्स आणि स्मिथला तंबूचा रस्ता दाखवला. ही पडझड सुरू असताना हेटमायरने आपलं अर्धशतक झळकावलं. पण त्याला रवी बिष्णोईने बाद केले. त्याने ५ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ३५ चेंडूंत ५६ धावा काढल्या. त्याच षटकात मेकॉयला बाद करत रवी बिष्णोईने सामना भारताच्या खिशात घातला. वेस्ट इंडिजचा संघ १५.४ षटकांत केवळ १०० धावा करून परतला होता. भारताने हा सामना ८८ धावांनी जिंकला. तर मालिका ४-१ अशी जिंकली.

आशिया कपच्या अाधी मिळालेला हा विजय भारतीय राखीव खेळाडूही सक्षम असल्याचं सिद्ध करतो.
अक्षर पटेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने ३ षटकांमध्ये १५ धावा देत ३ गडी बाद केले. तर मालिकावीर पुरस्कार अर्शदीप सिंगला देण्यात आला. झिंम्बांम्बे विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १८ ऑगस्ट पासून (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) दुपारी १२:४५ वाजता सुरू होणार आहे.

कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या महिला क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सुवर्ण पदक जिंकण्यासाठी खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला फलंदाजी करताना २० षटकांत १६१/८ अशी धावसंख्या उभारली. तर भारतीय संघ २० षटकांच्या खेळानंतर १५२/१० इतकीच मजल मारू शकला. भारतीय संघाला रजत पदकावर समाधान मानावे लागले.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार