महाराष्ट्राच्या जवानाला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण; जळगाववर शोककळा 

Spread the love

हायलाइट्स:

  • जळगावातील जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये अपघाती मृत्यू

  • दुचाकी दरीत कोसळल्याने अपघात

  • जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील भारतीय सैन्य दलातील जवानाला अपघाती वीरमरण आले आहे.

जळगाव : – गेल्या काही दिवसांपासून देशाचा सीमावर्ती भाग जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराकडून येथे कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. स्वातंत्र्यदिनी कुठे घातपात होऊ नये म्हणून लष्कराला अलर्ट देण्यात आला आहे. देशातील अंतर्गत प्रमुख शहरांची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत एक वाईट बातमी समोर आली आहे. जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील भारतीय सैन्य दलातील जवानाला अपघाती वीरमरण आले आहे. ही बातमी समजल्यानंतर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.


जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी गावातील वीरपुत्र विपिन जनार्दन खर्चे भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार JCO पदावर कार्यरत होते. यांचा जम्मू-काश्मीर येथील उधमपूर येथे कर्तव्य बजावत असताना सोमवारी मोटासायकल दरीत कोसळून अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यातर्फे देण्यात आली आहे.

रात्री उशिरा त्यांचे पार्थीव निमखेडी गावात पोहचणार आहे. उद्या मंगळवारी दि. ९ रोजी त्यांच्या गावी सकाळी ८.३० वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. निमखेडी येथील मूळ रहिवासी विपीन खर्चे हे सध्या भारतीय सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. ते सेवा बजावत असताना खर्चे यांच्या दुचाकीचा अपघात झाल्याने त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. यामुळे निमखेडी गावात शोककळा पसरली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रूक विपीन जनार्दन खर्चे हे यांच बारावीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर ते लगेचच २ फेब्रुवारी २००० मध्ये सैन्य दलात भरती झाले. विविध ठिकाणी त्यांनी सैन्यदलात सेवा बजावली. आग्रा येथे असतांना वर्षभरापूर्वीच त्यांची नायब सुभेदार या पदावर पदोन्नती झाली होती. दरम्यान, त्यांचा सेवेचा कालावधी संपलेला होता. मात्र त्यांनी देशसेवेसाठी पुन्हा आपला कालावधी वाढवून घेतला होता. सोमवारी उधमपूर येथे कर्तव्य बजावत असतांना दुचाकी दरीत घसरुन त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

महिनाभऱ्यापूर्वी घरी आले, भेट ठरली शेवटची

विपीन खर्चे यांच्या पश्चात आई इंदुबाई, पत्नी रुपाली व दोन मुले सोरा वय ७ वर्ष व मुलगा आरव वय ५ वर्ष तसेच दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. विपीन हे घरात एकुलते एक होते. तसेच गावातून सैन्य दलात भरती होणारे ते पहिलेचे सूपूत्र होते. दरम्यान महिनाभरापूर्वी विपीन खर्चे यांच्या पत्नी रुपाली यांचा भाऊ आजारी असल्याने विपीन खर्चे हे सुटी घेवून घरी आले होते. यादरम्यान आजारी शालकाजवळ जळगाव येथे रुग्णालयात विपीन खर्चे हे स्वत: थांबले होते. त्यानंतर सुटी आटोपून ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते.

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे

दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. “जळगाव जिल्ह्यातील निमखेडी बु., ता. मुक्ताईनगर येथील जवान विपिन खर्चे यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानास सलाम. खर्चे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा आशयाचं त्यांनी ट्वीट केलं आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार