ट्विटरच्या डीपीवर उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणाले, शिरसाटांच्या मनात नेमकं काय?

Spread the love

Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यासोबत त्यांनी महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे असा उल्लेख करणारे ट्विट केलं आहे. शिरसाट यांच्या ट्विटमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..

मुंबई :- आमदार संजय शिरसाट हे पुन्हा शिवसेनेत जाणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करुन उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असं म्हटलं आहे. शिरसाट यांच्या ट्विटमुळं शिंदे समर्थक आमदारांच्या गटामध्ये खळबळ उडाली असल्याची माहिती आहे. शिवसेना आमदार बंड करुन गुवाहाटीला गेल्यानंतर संजय शिरसाट यांनी पत्र लिहून टीकास्त्र सोडलं होतं. संजय शिरसाट हे मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज आहेत. शिरसाटांच्या ट्विटमुळं संभ्रमावस्था वाढलीय, त्यामुळं शिरसाट उद्धव ठाकरेंच्या गटात जाणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणारे आणि आज उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणणारे संजय शिरसाट हेच का असा सवाल उपस्थित होतं आहे. संजय शिरसाट यांनी ट्विटरच्या डीपीवरील उद्धव ठाकरे यांचा सोबतचा फोटो हटवत एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवला. संजय शिरसाट यांनी ते ट्विट देखील डिलीट केलं आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

आम्ही ज्यावेळी शिवसेनेत काम करत होतो. आम्ही आजही शिवसेनेत काम करतो. उद्धव ठाकरे आमचे कुटुंबप्रमुख होते. एकनाथ शिंदे आता आमचे कुटुंबप्रमुख आहेत. उद्धव ठाकरेंशी मतभेद असले तरी त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही, अशी भूमिका पहिल्या दिवसापासून घेतली आहे. उद्धव ठाकरे काही काळ आमचे कुटुंबप्रमुख होते. उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नव्हती, आमचा त्याला विरोध होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको, असं आमची भूमिका आहे. भूमिका पटत नाही मात्र नातं तोडलेलं नाही, आम्ही दूर गेलो नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.

मी मंत्रिपदासाठी दबाव आणत नाही. एखाद्यावर विश्वास ठेवला किंवा एखाद्याला आपलं मानलं तर त्याच्यासाठी मान कापली गेली तर हरकत नाही. एकनाथ शिंदे जे भूमिका घेतील ती भूमिका मान्य असेल, असं संजय शिरसाट म्हणाले. मातोश्रीवर पुन्हा जाणार नाही, असं संजय शिरसाट म्हणाले. उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलावी, भूमिका बदलणं तुमच्या हातात नसेल. शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतलीय त्यामुळं ४० आमदार बाहेर पडले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर राहिलो तर ती आमची आत्महत्या ठरली असती. आम्ही शिवसेना म्हणून बाहेर पडलो, असून आम्ही शिवसेना काम करतोय, असं संजय शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट व्हिडिओ पोस्ट करुन दबावतंत्र राबवतात का?

एकनाथ शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळालेलं नाही. सप्टेंबर महिन्यात शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत संजय शिरसाट याचं नाव नव्हतं. मात्र, दुसऱ्या यादीत मंत्रिपद मिळावं म्हणून तर संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ पोस्ट करुन शिंदे सरकारवर एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न तर केला नाही, ना असा सवाल केला आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार