घरी फडकावलेल्या राष्ट्रध्वजाचे १५ ऑगस्टनंतर काय करायचे?; मुंबई महापालिकेनं दिला ‘हा’ सल्ला

Spread the love

Flag Code of India: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवला जात असतानाच सोहळ्यानंतर राष्ट्रध्वजाचे करायचं काय हा प्रश्न मुंबईकरांना सतावत आहे. यावर मुंबई महानगरपालिकेने एक सल्ला दिला आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवला जात असतानाच, मुंबई महापालिकेनेही विविध स्तरांवर उपक्रम राबवले आहेत. मुंबई महापालिकेने ‘घरोघरी तिरंगा’ वितरित करण्याचे अवघड शिवधनुष्य पेलत काही दिवसांच्या अवधीतच ४१ लाख तिरंग्यांचे घरोघरी वितरण केले आहे. मात्र, घरोघरी तिरंगा लावताना व ध्वज उतरवताना काय काळजी घ्यावी, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. यासाठीच मुंबई महानगरपालिकेने सामान्य मुंबईकरांना एक सल्ला दिला आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येणारा १५ ऑगस्ट हा ‘स्वातंत्र्य दिन’ आपण सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला. देशात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले. प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात येणार असला तरी ध्वजसंहितेचे पालन होणेही आवश्यक आहे. मुंबई महापालिकेनंही शनिवार, १३ ते सोमवार, १५ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण मुंबईत अनेकविध उपक्रम राबविले. ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेत पालिकेने ४० लाख राष्ट्रध्वजांची खरेदी केली आणि टाटा समूहानेही पालिकेस एक लाख राष्ट्रध्वज पुरविले. पालिकेने काही दिवसांच्या अवधीतच सर्व ४१ लाख तिरंग्यांचे घरोघरी वितरण केले. या ४० लाख साठ्यातील सदोष आढळलेले सुमारे साडेचार लाख तिरंगे पुरवठादाराकडून बदलून घेत त्याचे वितरण केले आहे. मात्र, १५ ऑगस्टचा सोहळा संपल्यानंतर तिरंग्याची काळजी कशी घ्यावी तसंच, तिरंग्याचा मान कसा राखला जावा, असा प्रश्न मुंबईकरांच्या मनात निर्माण झाला आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेने उत्तर देण्याचा प्रयत्न केला

ध्वजसंहिता काय सांगते?

भारतीय ध्वज संहितेतल्या नियम २.२ नुसार, कापडी राष्ट्रध्वज खराब झाल्यास किंवा त्याचा रंग फिका झाल्यास तो वापरणं टाळावं. असं न केल्यास तो तिरंग्याचा अपमान समजला जातो. अशा वेळी खराब झालेल्या राष्ट्रध्वजास वेगळ्या जागी नेऊन पूर्णपणे नष्ट करणं गरजेचं आहे. एक तर पूर्णपणे जाळून किंवा राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही अशा कोणत्याही पद्धतीने तुम्ही खराब ध्वज नष्ट करू शकता.

  • ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो जतन करून ठेवावा.

  • ध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ नये.

  • ध्वज फाटेल अशा पद्धतीने तो फडकवू नये, अथवा बांधू नये.

  • राष्ट्रध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी किंवा अन्य कारणासाठी करू नये.

  • अभियान कालावधीनंतर झेंडा फेकू नये. तो सन्मानाने जतन करावा.

मुंबई महापालिकेने दिला सल्ला.

हर घर तिरंगा या मोहिमेंतर्गंत देण्यात आलेले राष्ट्रध्वज हे अभियान संपल्यानंतर नागरिक त्यांच्या घरी जतन करुन ठेवू शकतात.

या मोहिमेची एक आठवण म्हणून नागरिक तिरंगा घरीच जपून ठेवू शकतात. व पुढील वर्षी हाच तिरंगा पुन्हा वापरु शकतात, असा सल्ला मुंबई महानगरपालिकेने दिला आहे.

घरी फडकावलेला ध्वज सायंकाळी उतरवू नका; राष्ट्रध्वज फडकवण्यापूर्वी ‘हे’ नियम माहिती करुन घ्या.

नागरिक काय म्हणतात?

मुंबई महानगरपालिकेने घरोघरी वाटप केलेले तिरंगा पुन्हा गोळा करुन वॉर्ड ऑफिसमध्ये जपून ठेवावेत. तसंच, प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधी पुन्हा घरोघरी त्याचे वाटप केले जावे, असं सायन येथे राहणारे आर. श्रीधर यांचे मत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार