७५ वर्षांवरील ज्येष्ठांना ‘एसटी’ मोफत; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

Spread the love

मुंबई : – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसगाडय़ांमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. राज्यात ६५ हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सध्या प्रवासभाडय़ात ५० टक्के तर शिवशाही बसेसमध्ये ४५ टक्के सवलत दिली जाते. आता ७५ हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठांना एसटी प्रवासाची मोफत सुविधा उपलब्ध होणार आहे.

गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

गोविंदा पथकातील गोविंदांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला. दहीहंडी उत्सव १९ ऑगस्ट रोजी साजरा होत असून शासनाने विमा कवच द्यावे, अशी गोविंदा पथकांची मागणी होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून विम्यापोटीचा हप्ता (प्रिमीयम) राज्य सरकार भरणार आहे.

वैद्यकीय उपकरणांसाठी..

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेट ई-मार्केटप्लेस या पोर्टलच्या माध्यमातून करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार