मी आज गद्दारांचा मुखवटा फाडायला आलोय : आदित्य ठाकरे
जळगाव :- जळगाव शहरात शिवसंवाद रॅलीच्या निमित्ताने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आले असता विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आज कुणी काहीही बोलत असले तरी गद्दार हे गद्दारच असतात. आज मी गद्दारांचा मुखवटा फाडायला आलो आहे असे आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आले आहे. गेल्या आठवड्यातील दौरा प्रकृती अस्वस्थतेमुळे रद्द झाल्यानंतर शनिवारी आदित्य ठाकरे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी सकाळी जळगाव विमानतळावर युवासेना ग्रामीणतर्फे तर त्यानंतर अजिंठा चौफुली येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डीमार्ट चौक, शिरसोली रस्त्याने ते पाचोरा येथे जाणार आहेत. आकाशवाणी चौकात शिवसेनेतर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
राज्यातील सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे तात्पुरते सरकार आहे तुम्ही लिहून घ्या. हिंदुत्वासाठी हे गेले नाही, फंडासाठी, मंत्रिपदासाठी हे गेले नाही केवळ १-२ लोकांच्या राक्षसी हेतूसाठी ते गेले. ४० निर्लज्ज लोक खोटे बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर हे गद्दार टेबलावर चढून बारमध्ये नाचले तसे नाचत होते. हे आमदार नव्हे गद्दार आहेत. त्यांनी माणुसकीसोबत गद्दारी केली आहे. प्रत्येक माणसाला सत्य कळायला हवे. ४० लोकांचा राजकीय जन्म आणि ओळख उद्धव ठाकरेंनी मिळवून दिली. जनतेच्या बळावर हे निवडून आले. ५० खोके घेऊन ते ओक्केमध्ये जाण्याचा विचार करीत होते असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, सरकार जाण्याचे मला बिलकुल दुःख नाही. सरकार येते जाते. तुम्ही पुन्हा सरकार आणणार याचा मला विश्वास आहे. जो महाराष्ट्र आपण पुढे नेत होतो तो महाराष्ट्र ते मागे आणण्याचा प्रयत्न करतील. रायगडाला आपण ६०० कोटी दिले हा आपला पहिला निर्णय होता. उद्धव साहेबांनी जे वचन दिले ते त्यांनी पाळले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा आपला शेवटचा निर्णय होता. आपण सर्व चांगले निर्णय घेतले. शेतकरी, महिला आणि सर्व समाजाचा विचार केला. शिवसेनेला एकटे पाडण्याचा हा कट आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा हा कट आहे. आपल्याला सर्वांना एकत्र राहायचे आहे. शिवसेनेला पुढे न्यायचे आहे, असे ठाकरे म्हणाले.
ठाकरे पुढे म्हणाले कि, गेली अडीच वर्षे महाराष्ट्राचा हा सुवर्णकाळ होता. कुठेही वाद झाला नाही, जातीपातीचे राजकारण आपण केला नाही. ४० गद्दार गावभर सांगतात आम्ही उठाव केला, क्रांती केली पण त्यासाठी हिम्मत लागते ते पळून गेले. ते गद्दार होते आणि गद्दारच राहणार. गद्दार पळून कुठे गेले आणि काय आणि काय पहिले ते सर्वांना माहिती आहे. तिथे जाऊन ते ओक्केमध्ये फिरत होते. ते ४० गद्दार तिथे स्वतःला शिवसैनिक म्हणवत होते तेव्हा त्यांना तेथील आसामची पूरस्थिती दिसली नाही. निर्लज्ज ४० लोक मज्जा करीत होते. सोशल मीडियात त्यांच्या क्लीप व्हायरल होत होत्या. ते खरे शिवसैनिक असते तर हॉटेलमध्ये मज्जा करण्यापेक्षा पाण्यात उतरून मदतीला धावले असते, असे ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी, आपल्याकडे त्यांना चांगली खाती मिळाली होती परंतु आता च्या सरकारमध्ये त्यांना स्वतःची लायकी कळली आहे. तुम्ही आहे तिथे सुखी रहा. गद्दार म्हणून तिथे राहायचे असेल तर सुखी राहा परंतु थोडी जरी लायकी शिल्लक राहिली असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. एकदा होऊन जाऊद्या ४० मतदार संघात पाहून घेऊ. ज्यांना शिवसेनेत परत यायचे आहे त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव उघडे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.