त्याच्याकडून सुमारे 43 लाखांचे सोने, 3 लाख 84 हजारांची रोकड, महागड्या घड्याळ, मोबाइल फोन, फाइल्स असा सुमारे 50 लाखांचा ऐवज जप्त
भुसावळ :- सध्या महाराष्ट्रात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच घरमालकाकडे तब्बल ५० लाखांचा ऐवज चोरून आपल्या गावाकडे पलायन करणार्या नोकराला आरपीएफ पथकाने गजाआड केले आहे.
याबाबत माहिती अशी की, मुंबईतील खार येथील बांधकाम व्यावसायिक मुकेश गांधी यांच्याकडे राहुल रोशन कामत (वय २५, मर्णेया, उमरकट, जि. मधुबनी, बिहार) हा कामाला होता. दरम्यान, राहुलने १९ ऑगस्टला दुपारी घरात कुणीही नसतांना सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व विदेशी चलन असे मिळून सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल लांबवला. येथून पलायन करून त्याने सूरत गाठले. तेथून तो अंत्योदय एक्सप्रेसने बिहारमधील आपल्या गावाकडे निघाला होता.
दरम्यान, नोकराने घरात हात साफ केल्यानंतर गांधी यांनी खारघर पोलिसांत तक्रार दिली होती. स्थानिक पोलिसांनी याची माहिती लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा यंत्रणेला दिल्यामुळे ते या नोकराच्या मागावर होते. यातून तो अंत्योदय एक्सप्रेसने गावी जात असल्याचे तपासात दिसून आले.
दरम्यान, भुसावळ येथील लोहमार्ग व आरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने २२५६४ अंत्योदय एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर आल्यावर कसून चौकशी करतांना जनरल डब्यातून प्रवास करणार्या राहूल कामत याला ताब्यात घेण्यात आले. झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून ४३ लाखांचे सोने, ३ लाख ८४ हजारांची रोकड, महागड्या घड्याळ, मोबाइल फोन, फाइल्स असा सुमारे ५० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला या संदर्भात रात्री उशीरापर्यंत आरपीएफ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
यांनी केली कारवाई :
ही कारवाई भुसावळ आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना, उपनिरीक्षक ए.के.तिवारी, सहायक फौजदार प्रेम चौधरी, प्रकाश थोरात व लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेर्डे, अजित तडवी, दिवाणसिंग राजपूत, धनराज लुल्ले यांच्या पथकाने केली.
कुंपणानेच खाल्ले शेत
राहुल कामत हा संशयीत मुंबईतील खारघर भागातील बांधकाम व्यावसायीक मुकेश गांधी यांच्याकडे नोकर म्हणून कामाला होता मात्र घरातील सोन्यासह रोकडवर त्याची नजर पडल्यानंतर त्याने शनिवारी मध्यरात्री घरात चोरी केली व पळ काढला. खारघर पोलिसात या प्रकरणी गांधी यांनी तक्रार नोंदवल्यानंतर आरोपी हा बिहारकडे पसार होईल ही शक्यता गृहित धरून खारघर पोलिसांनी स्थानिक लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा यंत्रणेला याची माहिती कळवली तसेच संशयीताचा फोटोदेखील पाठवला.
जनरल बोगीतून केली अटक
22564 अंत्योदय एक्स्प्रेस रविवारी दुपारी दोन वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यानंतर जनरल बोगीतून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या ताब्यातून सुमारे 43 लाखांचे सोने, तीन लाख 84 हजारांची रोकड, महागड्या घड्याळी व फोन, फाईल्स असा सुमारे 50 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
हे वाचलंत का ?
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४