भारताचा झिम्बांब्वेवर १३ धावांनी विजय मालिका ३-० जिकली

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पहिल्या एक दिवसीय सामन्यात झिम्बांब्वेला १० गड्यांनी तर दुसर्‍या सामन्यात ५ गडी राखून मालिकेत विजयी आघाडी घेणार्‍या भारतीय संघाच्या कर्णधार के. एल. राहुलने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.
मागच्या सामन्यात सलामीला आलेला राहुल आजही सलामीलाच उतरला. केवळ ३० धावांवर त्याचा त्रिफाळा ब्रॅड इव्हान्सने उध्वस्त केला. राहुलने ३ सामन्यांच्या मालिकेत केवळ ३१ धावा काढल्या, इतकंच त्याचं कर्णधार म्हणून योगदान. त्याच्या जागी फलंदाजीसाठी आलेल्या शुभमन गीलने धवनसह डावाला आकार देण्यास सुरूवात केली. पण धवनलाही ब्रॅड इव्हान्सने ४० धावांवर बाद केले. ईशान किशन आणि गीलची जोडी मैदानात हवे तिथे फटके मारत धावसंख्येला आकार देत होती. ईशान ५० धावांवर असताना धावबाद झाला आणि झिम्बांब्वेला पाहिजे असलेला क्षण लाभला.

शुभमन गील एका बाजूने आपली कामगिरी बजावत होता. बघताबघता त्याने शतक पूर्ण केले. त्याने १५ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ९७ चेंडूंत १३० धावा काढल्या. त्यालाही ब्रॅड इव्हान्सने बाद केले. भारताची मधली फळी पूर्णपणे ढेपाळली. पहिल्या चार फलंदाजांच्या मिळून २५० धावा असताना पुढच्या ६ फलंदाजांनी केवळ ३९ धावा काढल्या. आणि आशिया कप पूर्वी आपण किती तयार आहोत हेच दाखवून दिले. त्यामुळे ५० षटकांत भारतीय संघ केवळ २८९/८ इतकीच मजल गाठू शकला. ब्रॅड इव्हान्सने ५४ धावांमध्ये ५ गडी बाद केले. त्याने धवन, राहुल, गील, हुडा आणि शार्दुल ठाकूरला बाद केले.
झिम्बांब्वेला पहिला झटका दीपक चहरने दिला. पण दुसरा गडी बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाजांना घाम गाळावा लागला. सीन विल्यम्सने ७ चौकारांसह ४५ धावा काढल्या. त्याला अक्षर पटेलने पायचीत टिपले.

पुढच्याच षटकात टोनी मुन्योंगाला १५ धावांवर आवेश खानने बाद केले. सिकंदर रझा पुन्हा संघाच्या मदतीला धावून आला. तो धावा जोडत होता आणि त्यांचे फलंदाज आततायीपणा करत बाद होत होते. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर रेगिस चकाब्वा १६ धावांवर बाद झाला. तर पुढच्याच षटकात सलामीवीर कायतानो कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर १३ धावांवर बाद झाला. दीपक चहरने रियान बर्लला ८ धावांवर झटपट बाद केले. तर कुलदीप यादवने ल्यूक जोंगवेला १४ धावांवर बाद केले. झिम्बांब्वेचा संघ १६९/७ अशा बिकट अवस्थेत सापडला. पण पहिल्या सामन्या प्रमाणे भारतीय गोलंदाजांची परीक्षाच सिकंदर रझा आणि ब्रॅड इव्हान्सने घेतली. दोघही धावा जोडत होते.

बघताबघता त्यांनी प्रथम अर्धशतकी नंतर शतकी भागीदारी रचली अ‍ाणि भारतीय गोलंदाजीची पिसं काढली. ४८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आवेश खानने ब्रॅड इव्हान्सला २८ धावांवर पायचित टिपले आणि भारतीयांनी सुटकेचा श्वास सोडला. पुढच्याच षटकात झटपट धावा जोडण्याच्या नादात सिकंदर रझा शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ९ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ९५ चेंडूंत ११५ धावा काढल्या. त्याच्यासोबतच झिम्बांब्वेच्या उरल्यासुरल्या आशाही संपल्या. झिम्बांब्वेचा संपूर्ण संघ ४९.३ षटकात २७६ धावांवर परतला. आवेश खानने ६६ धावांमध्ये ३, अक्षर पटेलने ३० धावांमध्ये २, कुलदीप यादवने ३८ धावांमध्ये २, दीपक चहरने ७५ धावांमध्ये २ तर शार्दुल ठाकूरने ५५ धावांमध्ये १ गडी बाद केले.

पहिल्या दोन सामन्यात २०० धावसंख्याही न उभारू शकलेला झिम्बांब्वेचा संघ आज २७६ धावा उभारू शकला यावरूनच भारतीय गोलंदाजांची तयारीही दिसून येत आहे. भारताने सामन्यातील विजयासह मालिकाही ३-० अशी जिंकली असली तरीही फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण य़ा तीनही महत्वाच्या भागात सपाटून मार खाल्ला आहे.
शुभमन गीलला सामनावीर तसेच मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने १३० धावा काढल्या होत्या.
आशिया कप २०२२ मध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध रविवार २८ ऑगस्ट रोजी (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) रात्री ७:३० वाजता सुरू होणार आहे.

आपण या बातम्या वाचल्यात का

टीम झुंजार