पारोळा :- सध्या महाराष्ट्रात मारहाण झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच पारोळा तालुक्यातील कराडी येथील सालदाराच्या मृत्युप्रकरणी शनिवारी अखेर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घराबाहेर शिवीगाळ केल्याच्या कारणावरून सालदाराला बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी साडेतीन महिन्यांनंतर शवविच्छेदनाचा अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरुवातीला शिवीगाळ
मध्य प्रदेशातील बैताकवाडी येथील रुख्माबाई कमल चव्हाण (वय 32, ता. पानसमेल, जि. बडवानी) यांनी या संदर्भात पारोळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, कमल चव्हाण हे दोन वर्षांपासून तालुक्यातील कराडी येथे बबलू पाटील यांच्या शेतात सालदारकीचे काम करत होते. बबलू पाटील यांनी या कमल चव्हाण यांना घर बांधून दिले असून ते परिवारासह तेथे राहत होते.17 मे रोजी शेतात मिरची लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी रुख्माबाई घरी पाणी पिण्यास आली असता बबलू पाटील यांच्या शेताच्या शेजारी शेतकरी मुकुंदा पाटील यांच्यासह अन्य तीन जण एकमेकांना शिवीगाळ करत होते.
पुन्हा केली मारहाण
कमल चव्हाण यांनी ‘माझा परिवार राहत असल्याने शिवीगाळ करू नका’, असे सांगितले. या कारणावरून त्यांनी शिवीगाळ करुन खाटेवर बसलेल्या कमल चव्हाण यांना पोटात लाथ मारली. या मारहाणीमुळे कमल चव्हाण यांच्या पोटात सतत दुखत होते. त्यामुळे कमल चव्हाण यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार करुनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यांना नंदुरबार येथील रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना 8 जून रोजी कमल चव्हाण यांचा नंदुरबार येथे रुग्णालयात मृत्यू झाला.
खरे कारण समोर
घटनेनंतर चव्हाण कुटुंबीय मुळगावी परतले होते. सुमारे तीन महिन्यानंतर शवविच्छेदनाचा अहवाला प्राप्त झाला. मारहाणीमुळे झालेल्या दुखापतीत कलम चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे अहवालातून निष्पन्न झाले. त्यानुसार शनिवारी रुख्माबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकुंदा पाटील याच्या विरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव तपास करत आहेत.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम