मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आशिया कप २०२२ श्रीलंकेतील घडामोडींमुळे अखेर दुबईत खेळविण्यात येत आहे. काल झालेल्या उद्घाटनीय सामन्यात अफगाणीस्थानने श्रीलंकेवर ८ गडी राखून जबरदस्त विजय मिळवला. त्यामुळे ह्यापुढे ही स्पर्धा अधिकाधिक रोमांचक होत जाईल.
आज सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा ज्या सामन्यासाठी आतुर झाल्या होत्या, तो भारत पाकिस्तान सामना दुबईत रंगला. भारतीय संघाच्या कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर अाझम केवळ १० धावांवर भुवनेश्वर कुमारचा बळी ठरला. मोहम्मद रिझवान आणि फखर जमान हळूहळू धावा जमा करत होते. पण जमानला १० धावांवर आवेश खानने तंबूचा रस्ता दाखवला. मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांनी सामन्याची सूत्रं हातात घेतली. १०व्या षटकात ६८/२ अशी धावसंख्या त्यांनी उभारली. इफ्तिखार डोईजड ठरू पाहत असताना हार्दिक पांड्याने त्याला २८ धावांवर बाद केले.
त्याची जागा खुशदिल शहाने घेतली. सुरुवातीपासून संघाच्या धावसंख्येला आकार देणारा रिझवान हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर ४३ धावांवर बाद झाला.
त्याच षटकात खुशदिल शहाला देखील पांड्याने बाद केले. दोन नवीन खेळाडू फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उतरले आबीद खान आणि आसिफ अली. १५व्या षटकांत पाकिस्तानची धावसंख्या १०२/५ अशी झाली. आसिफ अलीला ९ धावांवर बाद करत भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानला पुन्हा एक हादरा दिला. पुढच्या षटकात अर्शदीप सिंगने मोहम्मद नवाजला बाद करत अजून एक झटका दिला. भुवनेश्वर कुमारने अधिक टिच्चून मारा करत शादाब खानला बाद केले. नसीम शहाला देखील त्याने पहिल्याच चेंडूवर पायचीत टिपले. शहनवाज दहनीने दोन षटकारांसह काढलेल्या १६ धावांमुळे पाकिस्तानचा संघ १९.५ षटकांमध्ये १४७ धावांवर तंबूमध्ये परतला. भुवनेश्वर कुमारने २६/४, हार्दिक पांडय़ाने २५/३, अर्शदीप सिंगने ३३/२ आणि आवेश खानने १९/१ गडी बाद केले.
के. एल. राहुलचा शून्यावर त्रिफाळा नसिम शाहने उध्वस्त केला. झिम्बांब्वे मालिकेतलं अपयश त्याचा पिच्छा सोडत नाही. रोहित शर्मा आणि कोहलीची ४९ धावांची भागीदारी मोहम्मद नवाजने भंग केली. रोहित १२ धावांवर बाद झाला. तर नवाजच्या पुढच्याच षटकात कोहली ३५ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव इंग्लंड दौर्यानंतर फलंदाजी विसरला आहे. आजही नसिम शाहने त्याचा त्रिफाळा १८ धावांवर उध्वस्त केला. १६व्या षटकात भारतीय संघ १०७/४ इतकी मजल मारू शकला. भारतीय संघाला विजयासाठी ६ चेंडूंत ७ धावांची गरज होती आणि मोहम्मद नवाजने रवींद्र जडेजाला ३५ धावांवर बाद केले. ३ चेंडू ६ धावा असं समीकरण झालं. आणि हार्दिक पांड्याने उत्तुंग षटकार मारत विजय भारताच्या नावावर केला. भारताने सामना २ चेंडू आणि ५ गडी राखून जिंकला. पांड्यने नाबाद ३३ धावा काढत विजयाला गवसणी घातली.
मोहम्मद नवाजने ३३/३ तर नसिम शाहने २७/२ गडी बाद केले.भारताच्या आघाडीच्या फलंदाजांपेक्षा नंतर फलंदाजी केलेल्या खेळाडूंनी जास्त धावा काढल्या. पाकिस्तान सोबतचा विजय कठीण करण्यासाठी तेच कारणीभूत ठरले. गोलंदाजांनी चोख कामगिरी करूनदेखील फलंदाजांकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.
हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने नाबाद ३३ धावा काढल्या आणि २५ धावांमध्ये ३ गडी बाद करत अष्टपैलू कामगिरी केली होती.
आशिया कप २०२२ चा भारताचा दुसरा सामना हाँगकाँग विरुद्ध बुधवार ३१ ऑगस्ट रोजी (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) रात्री ७:३० वाजता सुरू होणार आहे.