पुणे-सोलापूर महामार्गावर फायरिंग करत 3.60 कोटी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सहा जणांना अटक

Spread the love

इंदापूर-पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ वरकुटे बुद्रुकजवळ गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार करून ३ कोटी ६० लाख रुपये लुटण्यात आले होते. या दरोडेखोरांच्या टोळीचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. इंदापूर पोलीस ठाण्यात भावेशकुमार अमृत पटेल (रा. कोडा, ता. जि. मेहसाना, गुजरात) यांच्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती ( पुणे ) :- अवघ्या पुणे जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या आणि पोलीस यंत्रणेची झोप उडवणाऱ्या या इंदापूर-पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळील दरोड्याच्या घटनेचा छडा लावण्यासाठी डॉ. अभिनव देशमुख, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तब्बल तीन तर इंदापूर पोलिसांची तीन अशी सहा पथके तैनात केली होती. त्यानुसार वेगाने तपास करीत या प्रकरणाचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलीस दलाला यश आले आहे.

या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून पोलीसांनी १ कोटी ४३ लाख २० हजार रूपये जप्त केले आहेत. सागर शिवाजी होनमाने (रा. कुर्डुवाडी ता. माढा जि. सोलापूर) याने इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची माहिती पोलीसांच्या पथकाला मिळाली होती.

त्यानुसार पोलीसांनी सागर शिवाजी होनमाने, बाळू उर्फ ज्योतीराम चंद्रकांत कदम (वय ३२ वर्षे, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) व रजत अबू मुलाणी (वय २४ वर्षे, रा. न्हावी, ता. इंदापूर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलीसांनी तपासात सागर होनमाने याकडून ७२ लाख रुपये, रजत अबू मुलाणी याचेकडून ७१ लाख २० हजार रूपये असे एकूण १ कोटी ४३ लाख २०,०००/- रूपये जप्त केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रत्येकी एक असे दोन पथक तात्काळ राजस्थान येथे रवाना करण्यात आले होते.

त्या पथकाने गुन्ह्यातील सहभाग असणारे आरोपी १) गौतम अजित भोसले (वय ३३ वर्षे, रा. वेने, ता. माढा, जि. सोलापुर), २) किरण सुभाष घाडगे (वय २६ वर्षे, रा. लोणीदेवकर, ता. इंदापूर, जि. पुणे), ३) भुषण लक्ष्मीकांत तोंडे (वय २५ वर्षे, रा. लोणी देवकर, ता. इंदापुर, जि. पुणे) यांना राजस्थानमधील उदयपूर येथील प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार