मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आशिया कप २०२२ च्या उद्घाटनीय सामन्यात अफगाणीस्थानने श्रीलंकेवर ८ गडी राखून जबरदस्त विजय मिळवला. तर कालच्या सामन्यात बांगलादेशवर ७ गडी राखून विजय मिळवला. आपल्या गटात दोन्ही सामने जिंकत त्यांनी प्रथम क्रमांकावर झेप घेतली. त्याचप्रमाणे भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तान तर आजच्या सामन्यात हाँगकाँगवर विजय मिळवत आपल्या गटात प्रथम क्रमांकावर झेप घेतली. हाँगकाँग संघाच्या कर्णधार निजाकत खानने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली.
मोठी धावसंख्या उभारण्याची संधी भारतीय संघाला मिळाली होती. भारताकडून सलामीला के. एल. राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा उतरले. डावाच्या ५व्या षटकात आयुश शुक्लाने रोहितला २१ धावांवर बाद केले.
राहुल आणि विराट धावसंख्येला आकार देतील असं वाटत असतानाच राहुलला मोहम्मद गझनफरने ३६ धावांवर बाद केले. विराट खूपच संथ खेळत होता. त्याला किमान लिंबूटिंबू संघाविरुद्ध अर्धशतक झळकावता आलं हेच खूप झालं. टि२० प्रकारात त्याने ३१वं अर्धशतक झळकावलं. ह्याआधी त्या ६ महिन्यांपूर्वी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध ५२ धावा काढल्या होत्या. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने शतक मारल्यालाही आता १००० दिवस उलटून गेले आहेत. तरीही कोहली जबरदस्ती संघातली जागा अडवून राहिला आहे. सूर्यकुमार यादवच्या बॅटने इंग्लंड दौर्यानंतर आज आपलं मौन सोडलं. त्याने ६ चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने २६ चेंडूंत नाबाद ६८ धावा काढल्या. २० षटकांच्या अखेरीस भारतीय संघाने १९२/२ अशी धावसंख्या उभारली.
हाँगकाँगकडून कर्णधार निजाकत खान आणि यासीम मुर्तझा खेळपट्टीवर उतरले. सामन्याच्या दुसर्याच षटकात अर्शदीप सिंगने मुर्तझाला ९ धावांवर बाद केले. निजाकत आणि बाबर हयात चांगले खेळत असताना रवींद्र जडेजाच्या थेट अचूक चेंडू फेकीने निजाकत खान १० धावांवर धावचीत झाला. झटपट धावा जमवणारा बाबरही भारतीयांची डोकेदुखी ठरत असताना रवींद्र जडेजाने त्याला बाद केले. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ४१ धावा काढल्या. एजाझ खानचा त्रिफाळा १४ धावांवर आवेश खानने उध्वस्त केला. किंचित शहादेखील चांगली फलंदाजी करत होता.
त्याला भुवनेश्वर कुमारने बाद केले. त्याने २ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ३० धावा काढल्या. हाँगकाँगची धावसंख्या ११६/५ अशी झाली होती. झीशान अली आणि यष्टिरक्षक स्कॉट मॅकेचीने ६व्या गड्यासाठी नाबाद ३६ धावांची भागीदारी केवळ १७ चेंडूंत केली. अलीने नाबाद २६ तर मॅकेचीने नाबाद १६ धावा काढल्या. हाँगकाँगची अंतिम धावसंख्या १५२/५ अशी होती. भारताने ४० धावांनी विजय मिळवला. पण भारतीय गोलंदाजीची पीसं काढली गेली हेच खरं.
सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने ६८ धावा काढल्या होत्या.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४
- धुळे येथे ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी आल्या मतदान केंद्रावर: महिलांची मते निर्णायक
- एरंडोल येथे आईच्या मृतदेह घरात, मुलाने केले मतदान: राष्ट्रीय कर्तव्य बजावून समाजाला दिला आदर्श.
- एक्झिट पोल २०२४: महाराष्ट्रातील ७ एक्झिट पोलमध्ये महायुती तर दोघांच्या सर्वेक्षणांमध्ये मते महाविकास आघाडीला बहुमत
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.१९ नोहेंबर २०२४